कात्रजमध्ये ज्येष्ठ महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने लुटले
'पुढे चोर आहेत’ अशी बतावणी केली
1 मिनट पठन

'पुढे चोर आहेत’ अशी बतावणी केली
पुणे: “पुढे चोर आहेत, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा,” अशी बतावणी करून दोन भामट्यांनी एका ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. कात्रज येथील वंडरसिटी चौक रोडवर बुधवारी (ता. २२) सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका ६७ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून कात्रज परिसरातील राजाराम गॅस एजन्सीच्या समोरील रस्त्याने जात होत्या. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी महिलेला थांबवले. “पुढे चोरांनी मोठा राडा केला असून ते दागिने ओरबाडून घेत आहेत, तुम्ही तुमचे दागिने काढून सुरक्षित ठेवा,” अशी भीती त्यांनी महिलेला घातली.
भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने आपल्या अंगावरील १ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढले. यावेळी “आम्ही तुम्हाला हे दागिने कागदात नीट गुंडाळून देतो,” असे भासवून भामट्यांनी ते दागिने हातात घेतले. त्यानंतर अत्यंत वेगाने हातचलाखी करून त्यांनी दागिन्यांचे पाकीट बदलले आणि मूळ दागिने स्वतःकडे ठेवून महिलेच्या हातात कागदाची रिकामी पुडी दिली. महिला काही समजण्याच्या आतच दोन्ही आरोपी तिथून पसार झाले. घरी गेल्यानंतर दागिन्यांऐवजी पुडीत काहीच नसल्याचे लक्षात आल्यावर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रस्त्याने जाताना कोणीही अनोळखी व्यक्तीने दागिने काढण्यास सांगितल्यास त्याला बळी पडू नका आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन भारती विद्यापीठ पोलिसांनी केले आहे.
Elderly woman robbed of jewellery worth Rs 2.5 lakh in Katraj
