मुख्य सामग्री पर जाएँ

वेल्हा तालुक्यात 'हॉटेल श्रीनाथ’मध्ये राडा

पूर्व वैमनस्यातून केला पिस्तूलातून गोळीबार व कोयत्याने जीवघेणा हल्ला; ५ जणांवर गुन्हा

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

वेल्हा तालुक्यात 'हॉटेल श्रीनाथ’मध्ये राडा

पूर्व वैमनस्यातून केला पिस्तूलातून गोळीबार व कोयत्याने जीवघेणा हल्ला; ५ जणांवर गुन्हा

वेल्हा : दोन महिन्यांपूर्वी हॉटेलमध्ये जेवण न दिल्याच्या जुन्या वादाचा राग मनात धरून वेल्हा तालुक्यातील कोदवडी फाटा येथील 'हॉटेल श्रीनाथ’मध्ये घुसून एका गुंडाने आपल्या साथीदारांसह मिळून हॉटेल मालकासह वेटरवर पिस्तुलातून थेट गोळीबार केल्याची आणि कोयत्याने सपासप वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी हॉटेलमधील फर्निचर आणि फ्रिज तसेच हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड करत मोठे नुकसान केले. या थरारक आणि जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी वेल्हा पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत म्हस्कु तानाजी दसवडकर (वय ४१, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक, रा. अस्कवडी, ता. वेल्हे , राजगड, जि. पुणे) यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी गणेश धरपाळे (रा. वांजळे, ता. वेल्हे, जि. पुणे) आणि त्याच्या इतर चार अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), १८९(४), १९१(३), ३२४(४), ३५१(२), ३५१(३), ३५२, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५), ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ही थरारक घटना रविवार (ता. २४) रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १० वाजून २० मिनिटांच्या दरम्यान वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील कोदवडी फाटा येथील ‘श्रीनाथ हॉटेल’ मध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हस्कु दसवडकर हे कोदवडी फाटा येथे ‘श्रीनाथ हॉटेल’ चालवतात. सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपी गणेश धरपाळे हा हॉटेलमध्ये आला असता त्याला जेवण मिळाले नव्हते. याच गोष्टीचा तीव्र राग धरपाळे याच्या मनात होता. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फिर्यादी दसवडकर, त्यांची पत्नी, हॉटेलमधील वेटर दशरथ शिळीमकर आणि त्यांची पत्नी चंद्रा हे हॉटेलमध्ये काम करत असताना आरोपी गणेश धरपाळे हा त्याच्या चार अनोळखी साथीदारांसह हॉटेलमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ करू लागला. वाद वाढत गेल्यावर आरोपी गणेश धरपाळे याने फिर्यादी म्हस्कु आणि वेटर दशरथ यांच्या दिशेने जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलमधून गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. मात्र त्यानंतर आरोपीने धारदार कोयत्याने फिर्यादी दसवडकर यांच्या डाव्या मांडीवर व कपाळाच्या डाव्या बाजूला वार करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने वेटर दशरथ शिळीमकर यांच्या डाव्या जबड्यावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपींच्या इतर साथीदारांनी हॉटेलमधील खुर्च्या आणि फ्रिजची तोडफोड केली. तसेच हॉटेलसमोर पार्क केलेली मोपेड दुचाकी (एम.एच. १२ एम.जी. ३७५७) लाथ मारून खाली पाडली आणि तिचे नुकसान केले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी “कोणी मध्ये आले तर खलास करून टाकू,” अशी धमकी देत तिथून पसार झाले.

दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून वेल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शेयर करें