मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : शहर नियोजनाचा बोजवारा, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येण्याची वाट पाहतोय : राज ठाकरे

Mumbai News :नवी मुंबई : शहर नियोजनाचा अभाव, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अपुऱ्या नागरी सुविधांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

शहर नियोजनाचा बोजवारा, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येण्याची वाट पाहतोय : राज ठाकरे
शहर नियोजनाचा बोजवारा, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येण्याची वाट पाहतोय : राज ठाकरे

Mumbai News :नवी मुंबई : शहर नियोजनाचा अभाव, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अपुऱ्या नागरी सुविधांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शहरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नसून, केवळ राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी येते, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

नवी मुंबई येथे आयोजित भव्य वाहतूकदार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाहतूकदारांचे विविध प्रश्न जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. तसेच शहर नियोजन, रस्ते आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर भाष्य केले.

शहर नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

परदेशात शहर नियोजनाला गांभीर्याने घेतले जाते; मात्र महाराष्ट्रात शहर नियोजनाला महत्त्व दिले जात नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ज्या ठिकाणी ५० लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे, तिथे ५०० लोक राहत आहेत. त्यामुळे शहर नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे ते म्हणाले.

वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुचाकीस्वारांकडून सिग्नलचे पालन केले जात नाही. वाहनतळांची कमतरता असल्याने वाहने कुठेही उभी केली जातात. मुलांना खेळण्यासाठी मैदाने, नागरिकांना फिरण्यासाठी बागा आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ उपलब्ध नसल्याचे मुद्देही त्यांनी उपस्थित केले.

बिल्डरांशी भागीदारीवरून सरकारवर निशाणा

शहरातील नागरी समस्यांवर सरकारकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची टीका करताना राज ठाकरे यांनी राजकारण्यांचे हितसंबंध बिल्डरांशी जोडलेले असल्याचा आरोप केला. बिल्डरांना प्रकल्प देणे आणि पैशांची गणिते साधणे यातच राजकारण्यांना रस असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारकडे अनेकदा प्रस्ताव देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याचा दावाही त्यांनी केला. शहरांमधील वाहतूक कोंडी, नियोजनाचा अभाव आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

शहरांचा विकास करताना नागरिकांच्या मूलभूत गरजा, सुरक्षित वाहतूक आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी या मेळाव्यात मांडली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें