Rain update News : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार
पुणे, महाराष्ट्र मिरर Rain update News : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे.
2 मिनट पठन

पुणे जिल्ह्यातील मुळशीसह चारही धरणातून विसर्ग वाढला
प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे, महाराष्ट्र मिरर Rain update News : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. परिणामी मुळशी, वडीवळे, चासकमान आणि खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, जलसंपदा विभाग आणि टाटा पॉवर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.Rain update News

मुळा नदीत १,००० क्यूसेक विसर्ग सुरू
मुळशी धरण ८१ टक्के भरल्यानंतर सकाळी १०.३० वाजता मुळा नदीत १,००० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि धरणातील पाण्याची आवक वाढल्याने अवघ्या काही तासांत धरणाचा पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर टाटा पॉवर प्रशासनाने दुपारी १२ वाजल्यापासून विसर्ग थेट ५,००० क्यूसेक करण्याचा निर्णय घेतला. पाऊस सुरू राहिल्यास किंवा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास विसर्गात आणखी वाढ अथवा बदल केला जाऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वडीवळे शंभर टक़्के भरण्याच्या मार्गावर
मावळ तालुक्यातील वडीवळे धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणीसाठा ९९.६० टक्क्यांवर पोहोचला असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी ८.३० वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग ३,५९२ क्यूसेकवरून वाढवून ४,७०४ क्यूसेक करण्यात आला आहे. पुढील पावसाच्या स्थितीनुसार या विसर्गात बदल केला जाणार असल्याचे पुणे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.Rain update News

चासकमान धोक्याच्या उंबरठ्यावर
चासकमान धरण देखील धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचले असून धरणात ९४.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने आज सकाळी ९ वाजल्यापासून भीमा नदीत ३,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार या विसर्गात वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असे चासकमान पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
खडकवासला धरण साखळीत मुसळधार
खडकवासला धरण देखील वेगाने भरत आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण धरण प्रणालीमध्ये १९.२७ टीएमसी (६६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये खडकवासला धरणात १.४३ टीएमसी (७३%), पानशेतमध्ये ७.५६ टीएमसी (७१%), वरसगावमध्ये ८.४७ टीएमसी (६६%) आणि टेमघरमध्ये १.८१ टीएमसी (४९%) पाणीसाठा आहे. धरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. खडकवासला धरणात ८,८५१ क्यूसेक, पानशेतमध्ये ४,६०६ क्यूसेक, वरसगावमध्ये ६,३१९ क्यूसेक, तर टेमघरमध्ये ९२० क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. ग्रामीण भागासाठी खडकवासला उजव्या कालव्यातून १,०५४ क्यूसेक पाणी सोडण्यात येत असून पुणे महापालिकेकडून पिण्याच्या पाण्यासाठी ५३६ क्यूसेक पाणी उचलले जात आहे. मात्र धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण या दोन्हीपेक्षा जास्त असल्याने धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यातूनही लवकरच विसर्ग सुरू करण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.Rain update News
नागरिकांनी सूचनांचे पालन करावे
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यान वाढ होत आहे. यामुळे सांडव्यावरून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात किंवा ओढे-नाल्यांमध्ये जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठावरील पाण्याचे पंप, वाहने, शेतीची अवजारे, जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन जलसंपदा विभाग, टाटा पॉवर आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Rain update News
