Pune News : खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी दिघीत जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने दिघी परिसरातून ताब्यात घेतले.
1 मिनट पठन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने दिघी परिसरातून ताब्यात घेतले. संग्रामसिंग गजलसिंग भादा (वय ३५, रा. शिवनगरी कॉलनी, डी. पी. रोड, आदर्शनगर, दिघी) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई २० ऑक्टोबर रोजी करण्यात आली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी गंभीर गुन्ह्यांतील 'वॉन्टेड' आरोपींसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार युनिट चारचे पथक प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. पथक विश्रांतवाडी चौकातील पुणे–आळंदी रस्त्यावर आले असताना पोलीस अंमलदार नितीन साबळे आणि सुभाष आढाळ यांना बातमीदाराकडून भादा त्याच्या दिघीतील घरी असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ निरीक्षक जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शिवनगरी कॉलनी येथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव संग्रामसिंग भादा असल्याचे सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली.
पथकाने येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून खात्री केली असता, तो तेथे नोंद असलेल्या एका गुन्ह्यामध्ये पाहिजे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ सह बेकायदा जमाव, दंगल, शिवीगाळ व धमकीसंबंधीची कलमे, तसेच शस्त्र अधिनियम व अन्य कायद्यांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने त्याला येरवडा पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.
अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त निखिल हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, अंमलदार सुभाष आढाळ, नितीन साबळे, जहागीर पठाण, अमजद शेख, दत्तात्रय गेंगजे, रोहिणी पांढरकर, अनिकेत भोसले आणि वैभव रणपिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
