Pune Crime : 'टेलिग्राम टास्क'च्या नावाने ३८ वर्षीय नागरिकाला ४८.६७ लाखांचा गंडा
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : ऑनलाईन माध्यमातून टेलिग्राम प्रीपेअड टास्क देऊन आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत पिसोळी परिसरातील एका ३८ वर्षीय नागरिकाची तब्बल ४८ लाख ६७ हजार ६८४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
5 मिनट पठन

Pune Crime : काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : ऑनलाईन माध्यमातून टेलिग्राम प्रीपेअड टास्क देऊन आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत पिसोळी परिसरातील एका ३८ वर्षीय नागरिकाची तब्बल ४८ लाख ६७ हजार ६८४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १४ जुलै २०२६ ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात मोबाईलधारक, लिंकधारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
काळेपडळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईलधारक आणि लिंकधारकाने फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील केले. तेथे लहान-सहान ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ४८,६७,६८४ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित नागरिकाने पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महंमदवाडीत हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
चालक अटकेत
पुणे, महाराष्ट्र मिरर : महंमदवाडीतील रहेजा व्हिस्टाजवळ शिवशंभु महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर हायवा वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता घडली. हमजा इमराना सरकार (वय २०, रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी फिर्यादी कैस खान (वय २०, रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैस खान हे आपल्या दुचाकीवरून मित्र हमजासह जात असताना हायवा चालक भागण्णा लक्ष्मण कटबू (वय ३४, रा. टिळेकरनगर, पुणे) याने आपले वाहन भरधाव वेगात, हलगर्जीपणाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवले व त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार ठोस मारली.
या अपघातात पाठीमागे बसलेल्या हमजाच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी जखमी झाले. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी आरोपी हायवा चालकाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) सह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार दिनेश रासकार पुढील तपास करत आहेत.
हडपसर ब्रीजवर आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर ब्रीजवर आयशर कंपनीच्या सहाचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास घडला. गणेश दत्तात्रय वाघमोडे (वय २२, रा. फुरसुंगी, पुणे) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मयत गणेश यांचे मेहुणे संतोष दडस (वय ३१, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून, दिगंबर चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ (१), १२५ (२) व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. .
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वाघमोडे हे आपल्या दुचाकीवरून हडपसर ब्रीजवरून जात असताना आयशर टेम्पो चालक दिगंबर दाजी चौधरी (वय ६०, रा. पेठ नायगाव, ता. हवेली) याने आपले वाहन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अत्यंत अविचाराने व भरधाव वेगात चालवून गणेश यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने गणेश यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलीस उपनिरीक्षक विद्याराणी फाटे पुढील तपास करत आहेत.
पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलेची २ लाखांची रोकड लांबवली
पुणे, महाराष्ट्र मिरर : हडपसर ते भेकराई, आळंदी व पुणे स्टेशन ते बालेवाडी असा पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीच्या हँडबॅगमधून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ ते सव्वाअकराच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी २३ वर्षीय महिला प्रवाशाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला कामानिमित्त पीएमपीएमएल बसने प्रवास करत होती. त्यांनी आपल्याजवळील हँडबॅगमधील प्लास्टिकच्या पिशवीत दोन लाख रुपयांची रोकड ठेवली होती. मात्र, बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा आणि गडबडीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चाणाक्षपणे हँडबॅगमधून ही पिशवी काढून घेतली व रोकड लांबवली.
प्रवास संपल्यानंतर हँडबॅग तपासली असता रोकड गायब असल्याचे महिलेच्या लक्षात आले, ज्यामुळे त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे या चोरीचा अधिक तपास करत आहेत.
तरुणाची फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
उरुळी कांचन/देवाची पोलिसांची कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर : २४ वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याची आर्थिक व मानसिक फसवणूक करत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास हनुमान मंदिराच्या पाठीमागे, कुंभारवाडा, उरुळी देवाची येथे घडली. आदेश नितीन जगताप (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मयत आदेशच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी महिलेने आदेश याला भुरळ पाडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याची फसवणूक करून त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपी महिलेने त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे संदेश (मेसेज) पाठवून नैराश्यात लोटले. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आदेश याने राहत्या घरात साडीच्या साह्याने सीलिंग फॅनला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोरवाल रोडवर भरधाव दुचाकीच्या धडकेत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
अपघात करून चालक झाला फरार
पुणे, महाराष्ट्र मिरर : धानोरी-लोहगाव भागातील पोरवाल रोडवर पनामा पार्क सोसायटीच्या गेटसमोर एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर मदत न करता चालक वाहनासह पसार झाला. ही घटना २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता घडून आली. सौरभ अनंत शेलार (वय ३०, रा. खेसे पार्क, लोहगाव, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मयत तरुणाचा भाऊ सागर अनंत शेलार (वय ४०) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीचालक अनिकेत मुकीदा इंगोले (वय २२, रा. निंबाळकरनगर, लोहगाव) याने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात व अविचाराने चालवून समोरून येणाऱ्या सौरभ शेलार यांच्या दुचाकीला जोरदार ठोस मारली.
या भीषण अपघातात सौरभ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी अनिकेत हा जखमीला मदत न करता व पोलिसांना खबर न देता पळून गेला. लोहगाव पोलिसांनी आरोपी अनिकेत इंगोलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करत आहेत.
