Pune News : पुण्यात रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका; चालकांच्या उत्पन्नावरही परिणाम
Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाचे सुधारित भाडे लागू झाले आहे.
2 मिनट पठन

Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाचे सुधारित भाडे लागू झाले आहे. पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपयांऐवजी २० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे दररोज रिक्षाने प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या खर्चात वाढ झाली आहे. विशेषतः छोट्या अंतराच्या प्रवासातही किमान भाडेवाढीचा थेट परिणाम जाणवत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दुसरीकडे, रिक्षाचालकांच्या मते, वाढत्या CNGच्या किमती, वाहनाची देखभाल, दुरुस्ती, विमा आणि इतर खर्चामुळे रिक्षा चालवणे महाग झाले आहे. नवीन भाडे लागू झाले त्याच दिवशी CNGच्या दरातही प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ झाली. त्यामुळे भाडेवाढ झाली असली तरी चालकांच्या हातात संपूर्ण वाढीव रक्कम उत्पन्न म्हणून राहत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
भाडेवाढीनंतर व्यवसायावरही काहीसा परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात प्रवासीसंख्या कमी होत असल्याचे चालक सांगतात. त्यातच प्रवासी मिळवण्यासाठी होणाऱ्या रिकाम्या फेऱ्यांचा खर्चही चालकांनाच सहन करावा लागतो.
दरम्यान, नवीन भाड्यानुसार मीटर कॅलिब्रेशनचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत पुण्यातील सुमारे १.४६ लाख रिक्षांपैकी केवळ ६ हजार रिक्षांचे मीटर नव्या दरानुसार कॅलिब्रेट झाले होते. त्यामुळे काही प्रवाशांमध्ये भाड्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, जादा भाडे आकारल्याच्या तक्रारीही समोर आल्या.
रिक्षा पंचायतचे नितीन पवार म्हणाले, “भाडेवाढीनंतर सुरुवातीचे दोन-तीन महिने प्रवासीसंख्या कमी होते. काही प्रवासी दरवाढ आणि मीटर कॅलिब्रेशनबाबत चालकांकडे शंका व्यक्त करत आहेत. त्यामुळे सध्या व्यवसायावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, तीन-चार महिन्यांत प्रवाशांना नवीन दरांची सवय होऊन व्यवसाय पुन्हा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.”
प्रवाशांना परवडणारे आणि चालकांना टिकणारे भाडे यांचा समतोल साधण्याबरोबरच सर्व रिक्षांचे मीटर वेळेत कॅलिब्रेट होणे आणि मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाते की नाही, यावर RTOचे नियंत्रण राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रिक्षा भाडेवाढ गरजेची आहे, कारण सीएनजी, देखभाल व घरखर्च वाढला आहे.
मात्र भाडेवाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होत असून रिक्षाच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे.
पूर्वी १५०० रुपयांचा धंदा व्हायचा, तो आता ७००–८०० रुपयांवर आला आहे.
भाडे वाढल्याने अनेक प्रवासी स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत.
त्यामुळे भाडे वाढूनही रिक्षाचालकांचे उत्पन्न वाढलेले नाही.
मीटर कॅलिब्रेशनच्या विलंबामुळे प्रवासी व चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
चालकांचा खर्च आणि ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन योग्य समतोल साधावा.
रिक्षाचालक व ग्राहक दोघांच्याही हिताचा न्याय्य भाडेदर निश्चित करावा, ही मागणी आहे.
खंडू चोरघे
रिक्षा चालक, शिवनेरी रिक्षा संघटना – सभासद
