Pune Rain : पावसाची संततधार कायम; तरीही पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा पुणे
3 मिनट पठन

Pune Rain : खडकवासला धरण समूहात १९५ एमसीएफटी पाण्याची आवक; सिंहगडावर दरड कोसळली
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा
पुणे
Pune Rain :
पुणे शहर आणि परिसरात गुरुवारपासून पावसाची ( pune rain) संततधार सुरू असली, तरी मान्सूनचा अपेक्षित जोर अद्याप न जाणवल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण समूह परिसरात चांगला पाऊस झाल्याने चारही धरणांमध्ये एकूण १९५ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाण्याची आवक झाली आहे. ( pune rain update dams alert sinhagad landslide)
मात्र, त्यानंतरही धरण समूहातील एकूण पाणीसाठा अवघा ३.९७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १३.६१ टक्के इतकाच शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती अत्यंत खालावलेली असून, मागील वर्षी आजच्याच दिवशी धरण समूहात १६.४१ टीएमसी (५६.३० टक्के) इतका मुबलक साठा उपलब्ध होता. (pune rain)

धरणनिहाय पाणीसाठ्याची सद्यस्थिती
खडकवासला धरणात ८ मिमी पावसाची नोंद झाली. धरणात ०.३० टीएमसी (१४.९७ टक्के) पाणीसाठा असून जलपातळी ५७८.२७ मीटर आहे. धरणात १० एमसीएफटी पाण्याचा विसर्ग सुरू असून सांडव्यावरून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
पानशेत धरण परिसरात सर्वाधिक ५३ मिमी पावसाची नोंद झाली. धरणात १२२ एमसीएफटी पाण्याची आवक झाली असून साठा १.९८ टीएमसी (१८.५८ टक्के) झाला आहे. जलपातळी ६१३.२३ मीटर असून वीजनिर्मिती केंद्र किंवा इतर मार्गाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. (pune rain)
वरसगाव धरणात ४७ मिमी पाऊस झाला. धरणात ८३ एमसीएफटी पाण्याची आवक झाली असून साठा १.६९ टीएमसी (१३.२१ टक्के) आहे. धरणाची जलपातळी ६१३.२५ मीटर असून कोणताही विसर्ग सुरू नाही. (pune rain)
Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी
टेमघर धरण परिसरात ४० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र धरणात अद्याप उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. धरणाची जलपातळी ६५८.५० मीटर असून सर्व विसर्ग बंद आहेत.
सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात १० एमसीएफटी पाण्याचा विसर्ग सुरू असून, सांडव्यावरून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. तसेच पानशेत आणि वरसगाव धरणांमधून वीजनिर्मिती केंद्र किंवा इतर मार्गांनी होणारा विसर्ग संपूर्णपणे बंद आहे.
Landslide : वरंधा घाटात दरड कोसळली; पंढरपूर-महाड मार्गावरील वाहतूक ठप्प
पवना आणि भामा-आसखेडची स्थिती
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ १६.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दु दुसरीकडे, उत्तर पुण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भामा-आसखेड धरणात तुलनेने सर्वाधिक २८.४ टक्के साठा असून, सध्या याच धरणातील स्थिती काहीशी समाधानकारक आहे. मात्र, एकूणच सर्व प्रमुख धरणांमधील पाणी कमी असल्याने प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (pune rain)
सिंहगडावर मुख्य दरवाजाजवळ दरड कोसळली
घाटमाथ्यावर सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ ३ ते ४ मोठे दगड थेट पायऱ्यांवर येऊन पडले.
"सकाळी वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी नियमित पाहणी करत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. दरड नेमकी कोणत्या वेळी कोसळली हे अद्याप स्पष्ट नसले तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही." अशी माहिती वनरक्षक समिती अध्यक्ष पांडुरंग सुपेकर यांनी दिली. (pune rain)
हेही वाचा: Ashadhi Wari 2026: पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; यंदाची 'सेवा वारी'
या घटनेनंतर वनविभागाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. प्रशासनाने पर्यटकांना किल्ल्यावर जाताना विशेष काळजी घेण्याचे आणि दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वीही सिंहगड घाट रस्त्यावर किरकोळ दरड कोसळून माती-दगड रस्त्यावर आले होते. मात्र, यंत्रणेने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता.
रास्तापेठेत पहाटे झाड कोसळले; वाहनांचे मोठे नुकसान
शहरात सुरू असलेल्या सलग दोन दिवसांच्या पावसामुळे अनेक भागांत झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. पुण्याच्या रास्तापेठ परिसरातील मंगलमूर्ती चौकात आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड उन्मळून पडले. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या अनेक गाड्यांवर हे झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या कापून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.
RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती
पुण्याच्या घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'
हवामान विभागाने (IMD) पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी पुढील २४ तासांचा इशारा जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होत असून, पावसाचा हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील परिसरासाठी 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाट रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
