मुख्य सामग्री पर जाएँ

Pune property News : राज्यातील सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र मालकी अभिलेख; जानेवारीपासून प्रायोगिक अंमलबजावणीची शक्यता

Pune property News : व्हर्टिकल प्रॉपर्टी रेकॉर्ड’मुळे फ्लॅटसोबत जमिनीतील प्रमाणशीर हिस्सा आणि सामायिक सुविधांवरील हक्कांचीही होणार अधिकृत नोंद

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

3 मिनट पठन

राज्यातील सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र मालकी अभिलेख
जानेवारीपासून प्रायोगिक अंमलबजावणीची शक्यता

Pune property News : महत्त्वाचे मुद्दे :

- प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र सरकारी मालकी अभिलेख

- जमिनीतील प्रमाणशीर हिस्सा आणि सामायिक सुविधांवरील हक्कांची नोंद

- पुनर्विकासानंतर नव्या सदनिकांची माहिती अद्ययावत करण्याची तरतूद

- जानेवारी २०२७ पासून प्रायोगिक अंमलबजावणीची शक्यता

- तीन कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्यांचा प्रस्ताव

पुणे: राज्यातील बहुमजली इमारतींमधील सदनिकाधारकांना त्यांच्या फ्लॅटच्या मालकी हक्काचा स्वतंत्र सरकारी अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी रेकॉर्ड’ अर्थात उभ्या मालमत्तेचा स्वतंत्र अधिकार अभिलेख तयार करण्याचा प्रस्ताव भूमी अभिलेख आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यापासून निवडक क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात ही व्यवस्था लागू करण्याचे नियोजन आहे.

सध्या एखाद्या व्यक्तीने बहुमजली इमारतीत सदनिका खरेदी केल्यानंतर त्याच्या मालकीची नोंद खरेदीखत आणि अन्य कागदपत्रांमध्ये होते. मात्र, संबंधित इमारतीखालील जमिनीमध्ये त्या सदनिकाधारकाचा नेमका किती हिस्सा आहे, तसेच इमारतीतील सामायिक जागा, अंतर्गत रस्ते आणि अन्य सुविधांवर त्याचा किती अधिकार आहे, याची स्वतंत्र व स्पष्ट नोंद महसूल अभिलेखांमध्ये उपलब्ध नसते. त्यामुळे पुनर्विकास, सदनिकेची विक्री, वारसाहक्क आणि जमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण झाल्यास अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते.

फ्लॅटसोबत जमिनीतील हक्कही नोंदवले जाणार

प्रस्तावित व्यवस्थेनुसार प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र अधिकार अभिलेख तयार केला जाणार आहे. यामध्ये इमारतीची ओळख, सदनिकेचा क्रमांक, मजला, कार्पेट क्षेत्रफळ, बांधकाम क्षेत्र (लागू असल्यास), मालकाचे नाव आणि मालकी मिळविण्याचा स्रोत यांचा समावेश असेल. त्याचबरोबर इमारतीखालील जमिनीतील संबंधित सदनिकाधारकाचा प्रमाणशीर हिस्सा आणि सामायिक सुविधांवरील अधिकारही नमूद केले जातील.

पुनर्विकास किंवा पुनर्बांधणी झाल्यानंतर नव्याने तयार होणाऱ्या सदनिकांच्या मालकीची माहिती अद्ययावत करण्याची तरतूदही प्रस्तावात आहे.

सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड कायम राहणार

नव्या व्यवस्थेमुळे सध्याचे सातबारा उतारे किंवा प्रॉपर्टी कार्ड रद्द होणार नाहीत. हे अभिलेख पूर्वीप्रमाणेच जमिनीच्या मालकीचे मुख्य दस्तऐवज राहतील. व्हर्टिकल प्रॉपर्टी रेकॉर्ड हा त्यांना पूरक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदनिकेच्या मालकीची स्वतंत्र माहिती महसूल यंत्रणेकडे उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्च महिन्यात या उपक्रमाला मान्यता देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत स्वतंत्र अधिकार अभिलेख तयार करण्यासाठी नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

तीन कायद्यांमध्ये दुरुस्तीची गरज

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम १९६३ आणि महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी हक्क अधिनियम १९७० या तीन कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सदनिकाधारकांच्या हक्कांची नोंद बंधनकारक करायची का, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आणि पुनर्विकासानंतर अभिलेख कसे बदलायचे, याबाबत कायदेशीर अभिप्राय घेतला जाणार आहे.

जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रायोगिक अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, अंतिम सरकारी मान्यता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper