Pune News : आचारसंहितेतही अत्यावश्यक कामांना हिरवा कंदील
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य आणि दैनंदिन सेवा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
2 मिनट पठन

Pune News : नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महापालिकेचा निर्णय
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य आणि दैनंदिन सेवा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मूलभूत कामे खोळंबू नयेत आणि शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता तसेच विद्युत व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी २०हून अधिक अत्यावश्यक प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
आचारसंहिता लागू झाल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा येतात. मात्र, नागरिकांना दैनंदिन सेवांमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनासोबत प्रशासकीय पातळीवर सखोल चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पाणीपुरवठा, जलवाहिन्यांची दुरुस्ती, पंपिंग यंत्रणा आणि आरोग्याशी संबंधित तातडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास प्रशासनाकडून कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या सर्व विकास व देखभाल प्रस्तावांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune News
कोणत्या कामांवर दिला जाणार विशेष भर?
शहर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागांमधील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यावर या बैठकीत मुख्य भर देण्यात आला. स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या गुजरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, गुजर-निंबाळकरवाडी आणि नवीन धायरी परिसरातील जलवाहिन्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे.
याशिवाय, बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, सणसनगर, नांदोशी आणि नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे भागातील पाणी वितरण व्यवस्था अधिक सुव्यवस्थित व नियंत्रित करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील पाणीपुरवठ्याचे दैनंदिन व्हॉल्व्ह (वाल्व) सोडणे व बंद करणे तसेच जनता वसाहत दांडेकर पूल ते राजाराम पूल परिसरातील व्हॉल्व्ह संचालनासाठी सुमारे ८१.७७ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे.
मुंढवा जॅकवेल व पंपहाऊस येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील पंप क्रमांक ५ व ८ साठी आवश्यक स्पेअर पार्ट पुरविणे व दुरुस्तीसाठी सुमारे ४९ लाख रुपये, तर मोटार, ट्रान्सफॉर्मर, स्टार्टर आणि इतर विद्युत यंत्रणेच्या देखभालीसाठी सुमारे ८८ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यासोबतच जुने लष्कर जलकेंद्र (ठाकरसी झोन), नवीन होळकर जलकेंद्र आणि चिखली जलकेंद्रातील व्हर्टिकल टर्बाइन पंपांच्या दुरुस्ती व सुट्या भागांच्या पुरवठ्याची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.
गणेशोत्सव व इतर धार्मिक-सामाजिक उत्सवांच्या काळात नागरिकांची व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या देखभालीसाठी सुमारे ६९.८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत, शहरातील विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांमधून निर्माण होणारा रिजेक्ट कचरा शास्त्रोक्त भूभरावापर्यंत (लँडफिल साईट) सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी हायवा टिपर उपलब्ध करून देण्याच्या ७९.९४ लाख रुपयांच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे.
सांस्कृतिक वारसा असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या आवश्यक सुधारणा आणि दुरुस्तीसाठी ६९.३४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक ३ मधील विमाननगर, सोमनाथनगर, संजय पार्क, बर्माशेल या परिसरातील नागरी सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ७६.५६ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
