PUNE NEWS : मेट्रो स्थानकांखाली रिक्षा-कॅबचा अनधिकृत अड्डा
वाहतूक कोंडीने प्रवाशांचा संताप; मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी स्थानक परिसरात नवी समस्या
2 मिनट पठन

वाहतूक कोंडीने प्रवाशांचा संताप; मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी स्थानक परिसरात नवी समस्या
प्रतीक्षा पारखी
पुणे PUNE NEWS: शहरातील मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक मेट्रो स्थानकांच्या खाली रिक्षा आणि कॅबचालकांनी अनधिकृतपणे वाहनतळ उभारल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नजरेसमोर ही परिस्थिती सुरू असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.PUNE NEWS

पुणे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, आरटीओ, शिवाजीनगर तसेच इतर प्रमुख मेट्रो स्थानकांच्या परिसरात दिवसभर रिक्षांच्या रांगा, दुहेरी पार्किंग आणि कॅबचालकांची मनमानी सुरू असते. परिणामी, मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी स्थानकांच्या बाहेरच नवे ‘कोंडी केंद्र’ निर्माण झाल्याची टीका होत आहे.
बसथांबा हलवला; मात्र बेकायदा पार्किंगवर कारवाई नाही
रामवाडी मेट्रो स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीचे कारण देत पीएमपीएमएलचा बसथांबा सुमारे २०० ते ३०० मीटर पुढे हलविण्यात आला. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अतिरिक्त अंतर चालावे लागत आहे. मात्र त्याच परिसरात स्थानकाखाली उभ्या असलेल्या रिक्षा आणि कॅबवर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.PUNE NEWS
"जर कोंडीसाठी बस जबाबदार असेल, तर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शेअर रिक्षा योजना फलकांपुरतीच
मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओने काही स्थानकांवर शेअर रिक्षा मार्ग आणि भाडेदर निश्चित केले होते. त्याबाबतचे फलकही उभारण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे जाण्यास नकार देत असल्याने आणि निश्चित दरांची अंमलबजावणी होत नसल्याने ही योजना केवळ कागदावरच राहिल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.PUNE NEWS
प्रवाशांची गैरसोय, चालकांची मनमानी
मेट्रोतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसमोर अवाजवी भाडे देणे किंवा पायी जाणे, हेच दोन पर्याय उरत असल्याचे चित्र आहे. रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्या तरी कारवाईच्या बाबतीत प्रशासनाची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कारवाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
वाहतूक शाखेकडून पुणे रेल्वे स्थानक मेट्रो स्टेशन परिसरात विशेष मोहीम राबविल्याचा दावा केला जात आहे. नो-पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आश्वासनही देण्यात येत आहे. मात्र काही दिवसांच्या मोहिमा आणि कायमस्वरूपी शिस्त यामध्ये मोठा फरक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.PUNE NEWS
अनुत्तरित प्रश्न कायम
मेट्रो स्थानकांखालील जागा अधिकृत पार्किंग स्टँड आहेत की अनधिकृत वाहनतळ? मीटरने जाण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांवर किती कारवाई झाली?
शेअर रिक्षा योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी कुठे होत आहे? प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेल्या मेट्रोच्या बाहेरच प्रवाशांची गैरसोय का होत आहे?
मेट्रोच्या खांबांखाली वाढलेली बेशिस्त वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाची कथित निष्क्रियता यामुळे "स्मार्ट सिटी"च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम मोडणाऱ्यांसाठी शहर अजूनही "फ्री पार्किंग झोन" असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
PUNE NEWS
