मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : वडगावशेरीत पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना अन्न विषबाधा

'गुरुनानक डेअरी अॅड स्वीट्स' या मिठाई दुकानावर एफडीएची कारवाई

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PUNE NEWS : वडगावशेरीत पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना अन्न विषबाधा

'गुरुनानक डेअरी अॅड स्वीट्स' या मिठाई दुकानावर एफडीएची कारवाई

पुणे PUNE NEWS: वडगावशेरी परिसरात नवीन दुचाकी खरेदीच्या आनंदात वाटण्यात आलेले पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना अन्न विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित 'गुरुनानक डेअरी अॅड स्वीट्स' या मिठाई दुकानावर छापा टाकत परवाना निलंबित केला असून उत्पादन आणि विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.PUNE NEWS

मिळालेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील एका नागरिकाने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर आनंदोत्सवासाठी संबंधित दुकानातून पेढे खरेदी केले होते. हे पेढे नातेवाईक आणि परिचितांना वाटण्यात आले. मात्र, पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच सात जणांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. बाधितांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

एका रुग्णाची प्रकृती गंभीर
सर्व रुग्णांना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.PUNE NEWS

या घटनेची माहिती पीडितांच्या नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

जिल्हाभरात एफडीएची धडक मोहीम
दरम्यान, भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात एफडीएने जिल्हाभरात मोठी कारवाई सुरू केली आहे. पुरंदर, वडगावशेरी आणि शिरूर परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून सडलेले आंबे, संशयित आंबा पल्प, आमरस तसेच विषबाधेला कारणीभूत ठरलेल्या पेढ्यांचा साठा जप्त करण्यात आला.PUNE NEWS

या कारवाईत सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.PUNE NEWS

ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

PUNE NEWS

शेयर करें