मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुण्यात खळबळजनक घटना; सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून येऊ लागली दुर्गंधी, पोलिसांनी दरवाजा उघडताच आढळला कुजून फुगलेला मृतदेह

•"नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावरील प्रकार; तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातापाताचा संशय."

व
विवेक

1 मिनट पठन

Pune News : पुण्यात खळबळजनक घटना; सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून येऊ लागली दुर्गंधी, पोलिसांनी दरवाजा उघडताच आढळला कुजून फुगलेला मृतदेह

•"नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावरील प्रकार; तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातापाताचा संशय."

पुणे :- पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि प्रसिद्ध सारसबाग परिसरासमोरील नेहरू स्टेडियमच्या रस्त्यावर एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक मारुती अल्टो कार (MH 12 SF 5471) या भागात बेवारसपणे उभी होती. यादरम्यान, शुक्रवारी अचानक त्या चारचाकी वाहनातून तीव्र दुर्गंधी सुटू लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला.

नागरिकांनी तत्काळ याची माहिती खडक पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष कारचा दरवाजा उघडून पाहिला. कारच्या आतील सीटवर 25 ते 30 वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह कुजून फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह दोन-तीन दिवसांपासून बंद गाडीत असल्यामुळे त्याचा तीव्र वास सुटला होता. प्राथमिक माहितीनुसार हा तरुण लोणी काळभोर येथील असून तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येचा संशय व्यक्त; पोलिसांकडून कसून तपास सुरू

मृत तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या काही खुणा असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हा घातपात असून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ही कार त्या ठिकाणी नक्की कोणी आणि कशी आणून उभी केली?यामागचे नेमकं सत्य काय आहे? या सर्व बाजूंचा छडा लावण्यासाठी खडक पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी करत आहेत. मृत तरुणाच्या कुटुंबीयांची ओळख पटवली जात असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Washim News : वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोठा राडा; समृद्धी महामार्ग रोखणाऱ्या आमदार नितीन देशमुखांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेयर करें