PUNE NEWS :३६ वाडे धोकादायक, रहिवाशांना तातडीने स्थलांतराचे आदेश
दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार नाही : महापालिका
1 मिनट पठन

निलेश राऊत
पुणे PUNE NEWS : मान्सूनच्या तोंडावर शहरातील जुन्या आणि अतिधोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील राहण्यास अयोग्य आणि अत्यंत जर्जर झालेल्या ३६ मिळकतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.PUNE NEWS
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अशा इमारतींचे सर्वेक्षण
पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये ऐतिहासिक आणि जुन्या वाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, योग्य देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि जर्जर झाली आहे. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अशा इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.
यंदाच्या सर्वेक्षणानुसार बांधकाम विभागाने ३६ अतिधोकादायक इमारतींची यादी निश्चित केली आहे. या वाड्यांवर आणि धोकादायक मिळकतींवर महापालिकेतर्फे 'धोकादायक' असे मोठे लाल फलक लावण्यात आले असून, त्या ठिकाणी सूचनापत्रकेही चिकटविण्यात आली आहेत.PUNE NEWS
दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार नाही
अतिवृष्टीमध्ये हे वाडे कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६८ (बी) व (सी) अंतर्गत सर्व संबंधित मालक, भाडेकरू आणि रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याचे कायदेशीर आदेश दिले आहेत. नोटीस मिळूनही जे नागरिक तेथेच राहतील, ते स्वतःच्या जबाबदारीवर राहतील, असा इशारा दिला आहे.
नियमानुसार वाड्यांची दुरुस्ती करण्यास परवानगी
अतिधोकादायक वाड्यांचे पाडकाम करण्याची मोहीम हाती घेतली जात असली, तरी ज्या वाड्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या ठिकाणी यूडीसीपीआर कायदा २०२० नुसार काम करावे लागेल. ही दुरुस्ती केवळ परवानाधारक वास्तुविशारद किंवा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनीअर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करणे बंधनकारक आहे.PUNE NEWS
शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा आणि रास्ता पेठ या भागांत सर्वाधिक जुने वाडे आहेत. पावसाळ्यात भिंती खचणे, छप्पर कोसळणे अशा घटना दरवर्षी घडतात. म्हणूनच, कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने यंदा आधीच ३६ मिळकती रिकाम्या करण्याची मोहीम तीव्र केली आहे.
PUNE NEWS
