मुख्य सामग्री पर जाएँ

Pune news: सलग नवव्या दिवशीही अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; शहरात धडक कारवाई

औंध-बाणेरसह धनकवडी-कात्रज परिसरात अनधिकृत बांधकामे हटविली; स्टॉल, शेड आणि अन्य साहित्य जप्त

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

अतिक्रमण कारवाई

Pune news:पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग नवव्या दिवशीही महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागांत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. औंध-बाणेर, नगररोड-वाघोली आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ९७ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तर धनकवडी-कात्रज-आंबेगाव परिसरातही रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

शहरातील वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांची दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागासह विविध क्षेत्रीय कार्यालयांनी संयुक्तपणे ही मोहीम सुरू केली आहे.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून तब्बल ८७ हजार चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये बांधकाम विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई केली. यामध्ये नऊ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने परिमंडळ क्रमांक पाचअंतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाला दिवसभर सहकार्य केले. या मोहिमेत एक हजार चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

धनकवडी-कात्रज परिसरातही कारवाई

धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. गजानन महाराज चौक ते तळजाई चौक आणि पुढे अरण्येश्वर मंदिर परिसरातील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत फ्रंट मार्जिनवरील सुमारे ७० हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे निष्कासित करण्यात आली.

उपायुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ क्रमांक तीनचे उपायुक्त विजय थोरात आणि धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी सात स्टॉल, एक खोका, दोन लोखंडी स्टँड, पाच पथारी, सात प्लास्टिक खुर्च्या आणि ३६ शेडसह विविध साहित्य जप्त करण्यात आले.

जेसीबी, क्रेनसह यंत्रणा तैनात

या मोहिमेत महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक, बांधकाम विभागाचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ११ जवान आणि २४ बिगारी सेवक सहभागी झाले होते. कारवाईसाठी दोन जेसीबी, एक गॅस कटर, एक क्रेन, चार ट्रक आणि पिंजरा वाहन तैनात करण्यात आले होते. शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर