मुख्य सामग्री पर जाएँ

एकता नगरीत पुणे मनपाची युद्धपातळीवर तयारी

सिंहगड रस्त्यावरील अत्यंत संवेदनशील आणि पूरप्रवण वसाहतीत पूर रोखण्यासाठी उपाययोजना

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

एकता नगरीत पुणे मनपाची युद्धपातळीवर तयारी

सिंहगड रस्त्यावरील अत्यंत संवेदनशील आणि पूरप्रवण वसाहतीत पूर रोखण्यासाठी उपाययोजना

आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून थेट मैदानात उतरून पाहणी; पावसाळ्यापूर्वी ‘प्रोटेक्टिव्ह वॉल’ पूर्ण करण्याचे कडक आदेश

पुणे: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, पुण्यातील अत्यंत संवेदनशील आणि पूरप्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील ‘एकता नगरी’ परिसराला पूरमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पुणे महापालिका आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांनी आज स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह एकता नगरी परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या विविध पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृश परिस्थिती आणि नागरिकांचे होणारे हाल टाळण्यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कोणतीही हयगय न करता सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेतल्या व त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या.

मुख्य सुरक्षा भिंतीच्या कामाचा आढावा
पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेषतः नदीकाठच्या भागात सुरू असलेल्या मुख्य सुरक्षा भिंतीच्या कामाचा आढावा घेतला. पावसाचे पाणी वस्तीत शिरू नये यासाठी ही भिंत अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, तिचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच, परिसरात सुरू असलेली सांडपाणी वाहिनीची कामे आणि त्यांची अंतर्गत जोडणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या यशस्वी प्रयोगाची पुनरावृत्ती करत, नदीच्या बाजूने पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी तात्पुरते मातीचे बंधारे उभे करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात वस्तीत पाणी साचू नये म्हणून सर्व ड्रेनेज लाईन्सचे क्लिनिंग करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यास सांगण्यात आले असून, यासाठी क्षेत्रीय कार्यालये आणि प्रकल्प विभाग यांनी परस्परांशी उत्तम समन्वय राखून काम करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण दौऱ्यात महापालिका आयुक्तांसोबत पुणे मनपाच्या विविध विभागांचे सर्वोच्च अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे प्रशासनाच्या गांभीर्याची प्रचिती येते. यामध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पाणी पुरवठा, घनकचरा, दक्षता, विद्युत आणि जनसंपर्क विभागाच्या प्रमुखांचा समावेश होता. आयुक्तांच्या या थेट हस्तक्षेपामुळे आणि ऑन-फील्ड पाहणीमुळे सिंहगड रस्ता परिसरातील पावसाळापूर्व कामांना आता प्रचंड गती मिळाली असून, यंदा पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शेयर करें