मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सोमवार पेठेतील जानकी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने १५ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४६ हजार २४० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

वक
विक्रांत कुलकर्णी

5 मिनट पठन

सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून १.४६ लाखांचा ऐवज लंपास
सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून १.४६ लाखांचा ऐवज लंपास

Pune News : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून १.४६ लाखांचा ऐवज लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सोमवार पेठेतील जानकी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने १५ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४६ हजार २४० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी सोमवार पेठेतील ४८ वर्षीय रहिवाशाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा जानकी अपार्टमेंटमधील फ्लॅट कुलूप लावून बंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. https://maharashtramirror.com/ Pune News

चोरट्याने बेडरूममधील कपाटातून १५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस फौजदार वाघेरे तपास करीत आहेत.

पिंपरी सांडसमध्ये घरफोडी; चांदीचे दागिने चोरीला

बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटले; ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास

पुणे, महाराष्ट्र मिरर : पिंपरी सांडस येथील बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने कपाटातील ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान नलगे मळा रस्त्यावर घडली.

याप्रकरणी पिंपरी सांडस येथील ७४ वर्षीय रहिवाशाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या कालावधीत चोरट्याने मुख्य दरवाजाची कडी आणि कुलूप उचकटून घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील कपाटातून ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक कांगणे तपास करीत आहेत.


अलंकार चौकात प्रवाशाला शस्त्राचा धाक

तिघांना अटक; बंडगार्डन पोलिसांकडून तपास सुरू

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे स्टेशनजवळील अलंकार चौकात रिक्षातून उतरलेल्या प्रवाशाला धारदार हत्याराचा धाक दाखवून तीन हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आकाश रमेश जाधव (वय २५, रा. काशेवाडी, भवानी पेठ), खदिर मुनवर शेख (वय २५, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि आफताब ख्वाजा शेख (वय २४, रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत कॅम्प परिसरातील ४१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलंकार चौकात रिक्षातून उतरले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना जबरदस्तीने पकडून अंधारात नेले. धारदार हत्याराचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखडे पुढील तपास करीत आहेत.

बँक खात्यातून पावणेनऊ लाख लंपास

खात्याचा अनधिकृत ताबा घेऊन ऑनलाइन पैसे हस्तांतरित

पुणे, महाराष्ट्र मिरर : बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्याचा अनधिकृत ताबा घेऊन अज्ञात सायबर चोरट्याने ८ लाख ९२ हजार ८०० रुपये ऑनलाइन हस्तांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वारजे येथील ४६ वर्षीय व्यक्तीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हा प्रकार १६ ते १७ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन माध्यमातून घडला. अज्ञात व्यक्तीने संगणकीय साधनांचा वापर करून तोतयेगिरी केली आणि फिर्यादीच्या बँक खात्यात प्रवेश मिळविला. त्यानंतर खात्यातील पैसे अन्यत्र हस्तांतरित करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुवर्णा हुलवान पुढील तपास करीत आहेत.


ॲल्युमिनियम पुरवठ्याच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक

चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : ॲल्युमिनियमच्या इंगॉट्सचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने पाषाण येथील ४० वर्षीय महिलेची १८ लाख ६६ हजार १६२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ई-मेलधारक, मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि संबंधित खात्यांच्या वापरकर्त्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी ४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादी महिलेशी ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. ॲल्युमिनियमचे इंगॉट्स उपलब्ध करून देण्याचे सांगून महिलेला विविध बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पैसे भरल्यानंतर साहित्याचा पुरवठा न करता १८ लाख ६६ हजार १६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शीतल जाधव पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांची बतावणी करून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक

गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत आरटीजीएसद्वारे पैसे उकळले

पुणे, महाराष्ट्र मिरर : पोलीस असल्याची बतावणी करून गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत चंदननगरमधील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख २० हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि संबंधित खात्यांच्या वापरकर्त्यांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२६ दरम्यान फिर्यादीशी मोबाईलवरून संपर्क साधला. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावरून लोकांना धमक्या तसेच अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठविण्यात आल्याची बतावणी करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून ‘पीएफआय’ संघटनेला पैसे पाठविण्यात आल्याचेही आरोपींनी सांगितले.

याप्रकरणी गुन्हा दाखल असून अटक केली जाईल, अशी भीती दाखवत आरोपींनी फिर्यादीला आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्याकडून एकूण १९ लाख २० हजार २०० रुपये उकळण्यात आले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८, ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप पुढील तपास करीत आहेत.

बोगस प्रमाणपत्रांद्वारे ४,४२७ कोटींची कर चुकवेगिरी

तीन कंपन्यांच्या फायद्यासाठी बनावट फॉर्म सादर केल्याचा आरोप

दोन सीएंसह इतरांविरुद्ध गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर : शेल तथा बोगस कंपन्यांची व्यवहारासंबंधी कागदपत्रे न तपासता परदेशात पैसे पाठविण्यासाठी कथित खोटी प्रमाणपत्रे तयार करून ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपयांच्या रकमेवरील शासकीय कर चुकविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक आयकर संचालक तन्मयी देसाई (वय ३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२२ ते २०२६ या कालावधीत कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिर चौकाजवळील शिवसमृद्धी आर्केड येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांनी संगनमत करून कथित शेल अथवा बोगस कंपन्यांच्या व्यवहारांची आवश्यक कागदपत्रे सादर न करता परदेशी चलन पाठविण्यासाठी फॉर्म १५ सीबीची प्रमाणपत्रे तयार केली. कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तयार केलेली प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागाकडे सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.

फॉर्म १५ सीए तयार करण्याचा अधिकार नसतानाही संबंधितांनी तो बेकायदेशीररीत्या तयार करून पोर्टलवर सादर केला. तीन कंपन्यांच्या फायद्यासाठी चार आर्थिक वर्षांत ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून त्यावरील शासकीय कर चुकविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), २३४, २२९ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें