Pune News : पुण्यात रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांच्या खिशाला फटका
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या रिक्षा भाडेवाढीचा फटका आता प्रवाशांच्या दैनंदिन बजेटला बसू लागला आहे.
2 मिनट पठन

Pune News : किमान भाडे २५ वरून ३० रुपये; मीटर कॅलिब्रेशनच्या संथ गतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या रिक्षा भाडेवाढीचा फटका आता प्रवाशांच्या दैनंदिन बजेटला बसू लागला आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित रिक्षाने प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासखर्चात वाढ झाली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाचालक संघटनांच्या मागणीनंतर ही भाडेवाढ मंजूर केली. सीएनजीच्या किमतींसह वाहनांच्या देखभाल आणि इतर परिचालन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन भाडेवाढ आवश्यक असल्याची भूमिका रिक्षाचालक संघटनांनी मांडली होती. यापूर्वी रिक्षाच्या भाड्यात ऑगस्ट २०२२ मध्ये बदल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
छोट्या अंतरासाठीही पाच रुपये जादा
नव्या दरांमुळे छोट्या अंतराच्या प्रवासासाठीही प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पहिल्या दीड किलोमीटरसाठी थेट पाच रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपये जादा आकारले जात आहेत. त्यामुळे रोज रिक्षाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या मासिक खर्चावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. नव्या दरपत्रकानुसार पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी १०० रुपये, तर १० किलोमीटरसाठी २०० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
मीटर कॅलिब्रेशनमुळे संभ्रम
दरम्यान, सुधारित भाडे लागू झाल्यानंतर रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन अपेक्षित वेगाने झाले नसल्याने प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये भाड्याबाबत संभ्रम निर्माण झाला. २२ सप्टेंबरपर्यंत पुणे आरटीओकडे नोंदणीकृत सुमारे १.४६ लाख रिक्षांपैकी केवळ सहा हजार रिक्षांचे मीटर नव्या दरानुसार कॅलिब्रेट झाले होते. त्यावेळी जादा भाडे आकारल्याच्या तक्रारीही समोर आल्या.
मात्र त्यानंतर कॅलिब्रेशनच्या कामाला गती मिळाली. २४ सप्टेंबरच्या अहवालानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ११ हजार रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन पूर्ण झाले होते. त्यापैकी सुमारे आठ हजार रिक्षा पुण्यातील, तर तीन हजार पिंपरी-चिंचवडमधील होत्या. प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आरटीओने मीटर तपासणी केंद्रांची संख्याही वाढवली आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत कॅलिब्रेशनची मुदत
रिक्षाचालकांना सुधारित दरानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत आरटीओने उपलब्ध करून दिलेल्या सुधारित दरपत्रकानुसार भाडे आकारता येणार आहे. त्यानंतर कॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरनुसार भाडे आकारणे आवश्यक असेल.
एकीकडे वाढत्या इंधन आणि देखभाल खर्चामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे; तर दुसरीकडे मीटर कॅलिब्रेशन आणि योग्य दरपत्रकाच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राहावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. त्यामुळे भाडेवाढीसोबतच सुधारित दरांची काटेकोर अंमलबजावणी आणि जादा भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आरटीओसमोर आहे.
“रिक्षा भाडेवाढ होणे आवश्यक होते; मात्र या भाडेवाढीचा प्रवाशांवर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी दिवसाला सुमारे १,५०० रुपयांचा व्यवसाय होत होता, तो आता अवघ्या ७०० ते ८०० रुपयांवर आला आहे. त्यातून रिक्षाचा खर्च आणि घरखर्च भागवणे कठीण होत आहे. भाडे वाढले, पण प्रवासी कमी झाल्याने रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर उलट परिणाम झाला आहे ( खंडू चोरघे रिक्षा ड्राइवर शिवनेरी रिक्षा संघटना एक सभासद)
