Pune Crime News : पुण्यात ४,४२७ कोटी रुपयांचा परदेशी चलन घोटाळा
*बनावट कागदपत्रे आणि खोट्या 'फॉर्म १५सीबी' प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठवून केली करचोरी
3 मिनट पठन

Pune Crime News : कात्रज-कोंढवा रोडवरील अंकुशकुमार सुरेशचंद बागरेचा आणि मोहित शिवकुमार तोडी या दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरुद्ध आणि तीन बनावट कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल; वित्तीय वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांच्या काळात तीन संशयास्पद शेल कंपन्यांसाठी काम केले
महत्वाचे मुद्दे
*बनावट कागदपत्रे आणि खोट्या 'फॉर्म १५सीबी' प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठवून केली करचोरी
*परदेशात पैसे पाठवण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या 'फॉर्म १५सीबी' प्रमाणपत्रांची कोणतीही कायदेशीर पडताळणी किंवा दस्तऐवजांची शहानिशा न करता ती बनावट प्रमाणपत्रे जारी करण्यात आली
*आयकर विभागाच्या पोर्टलवर 'फॉर्म १५सीए' च्या घोषणा बेकायदेशीरपणे अपलोड करून मोठ्या रक्कमेचे व्यवहार वैध असल्याचे भासवले
*आयकर विभागाच्या अधिकारी तन्मयी देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील येवलेवाडी पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला
*प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास तात्काळ पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) वर्ग करण्यात
*सरकारी तिजोरीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पुणे पोलिसांच्या इओडब्ल्यू या प्रकरकरत णाचा तपास वेगाने सुरू केला आहे
Pune Crime News : पुणे, महाराष्ट्र मिरर: बनावट कागदपत्रे आणि खोट्या 'फॉर्म १५सीबी' प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल ४,४२७.९२ कोटी रुपये बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून करचोरी केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) दोन चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) आणि तीन बनावट कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका मोठ्या करचोरी रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे सरकारी तिजोरीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.
पोलिसांनी नुकताच पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील कार्यालयातून काम करणाऱ्या अंकुशकुमार सुरेशचंद बागरेचा आणि मोहित शिवकुमार तोडी या दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. या दोघांनी चार आर्थिक वर्षांच्या काळात संशयास्पद शेल कंपन्यांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे निधी भारताबाहेर पाठवण्यासाठी आयकर विभागाची अनिवार्य कागदपत्रे बनावट तयार केल्याचा आरोप आहे.
कसा उघडकीस आला प्रकार?
आयकर विभागाच्या अधिकारी तन्मयी देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील येवलेवाडी पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास तात्काळ पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रोड परिसरात सीए फर्म चालवणाऱ्या या आरोपींनी वित्तीय वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांच्या काळात तीन संशयास्पद शेल कंपन्यांसाठी काम केले. परदेशात पैसे पाठवण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या 'फॉर्म १५सीबी' प्रमाणपत्रांची कोणतीही कायदेशीर पडताळणी किंवा दस्तऐवजांची शहानिशा न करता ती बनावट प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. तसेच आयकर विभागाच्या पोर्टलवर 'फॉर्म १५सीए' (Form 15CA) च्या घोषणा बेकायदेशीरपणे अपलोड करून या मोठ्या रक्कमेचे व्यवहार वैध असल्याचे भासवण्यात आले.
'फॉर्म १५सीबी' आणि करचोरीचे स्वरूप
नियमानुसार, भारतातून ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवताना संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने कर दायित्व पूर्ण केले आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी सीएची असते. यासाठी सीएने खातेपुस्तके, करार आणि व्यवहारांची प्रत्यक्ष शहानिशा करणे आवश्यक असते.
तथापि, आरोपी सीएंनी बनावट कंपन्यांशी संगनमत करून ही प्रक्रिया टाळली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कर न भरता तब्बल ४,४२७.९२ कोटी रुपये भारताबाहेर पाठवण्यात आले.
कायद्याचा बडगा आणि पुढील तपास
पुणे पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) (फसवणूक करणे), कलम २३४ (बनावट प्रमाणपत्रे जारी करणे), कलम २२९ (खोटे पुरावे तयार करणे), कलम ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात करचुकवेगिरीसाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या पोलिस या पैशांचा माग, यात सामील मध्यस्थ संस्था आणि आरोपी सीएंचे बनावट कंपन्यांशी असलेले थेट संबंध शोधत आहेत.
लातूर प्रकरणानंतरचा दुसरा मोठा धक्का
पुण्यातील या घटनेच्या अवघ्या महिनाभरापूर्वी, २३ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका सीएला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याने तब्बल १,८१० बनावट 'फॉर्म १५सीबी' जारी करून २,१४३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम परदेशात पाठवण्यास मदत केली होती.
एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या या प्रकरणांमुळे आयकर विभाग आणि वित्तीय गुन्हे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, परदेशी व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे.
