मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यात जनक्षोभ उसळला !

पर्वती येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नसरापूर नंतर पर्वती येथील घटनेनं समाजमनात भिती

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

पुण्यात जनक्षोभ उसळला !

पर्वती येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नसरापूर नंतर पर्वती येथील घटनेनं समाजमनात भिती

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलेले असतानाच, पुण्यात अशाच प्रकारची संतापजनक घटना समोर आली आहे. पर्वती परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने नऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

याप्रकरणी पर्वती पोलिसांनी संबंधित ५० वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. नसरापूर घटनेची जखम ताजी असतानाच शहरातील वर्दळीच्या भागात असा प्रकार घडल्याने पुणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

असा उघड झाला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ५) रात्रीच्या सुमारास पर्वती भागातील एका निर्जन ठिकाणी आरोपीने नऊ वर्षांच्या बालिकेला गाठले. त्याने बालिकेशी अश्लील चाळे करून जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. बालिकेच्या हालचाली आणि आरोपीचे संशयास्पद वर्तन स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने तिथे धाव घेतल्याने आरोपीचा प्रयत्न फसला. पकडल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पर्वती पोलीस ठाण्यात नेले.

पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पर्वती पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत नागरिक आक्रमक झाले होते. गर्दीचे स्वरूप पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे पर्वती परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती.

सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची झोड
पुण्यातील या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सरकारला जाब विचारला आहे. “राज्यात अशा घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकार आणि बालकल्याण विभाग केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण करत आहे का? सामान्य जनतेचा संयम सुटण्यापूर्वी ठोस पावले उचलली जावीत,” अशी टीका त्यांनी केली आहे.

पर्वती पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून बालिकेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीवर कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेयर करें