मुख्य सामग्री पर जाएँ

Politics: मुस्लिमांची मते हवीत, पण प्रतिनिधित्व नको? ओवैसींचा अखिलेश यादवांवर घणाघात

२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवैसींची रणनीती; चंद्रशेखर आझाद यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

Asaduddin Owaisi – AIMIM, Akhilesh Yadav – Samajwadi Party
Asaduddin Owaisi – AIMIM, Akhilesh Yadav – Samajwadi Party

Politics लखनौ : उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुस्लिमांची मते घेतली जातात; मात्र त्यांना राजकीय प्रतिनिधित्व दिले जात नाही, असा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच अखिलेश यादव यांनी हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारल्याचा दावाही त्यांनी केला.

२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त लखनौ येथे आयोजित बहुजन स्वराज संकल्प महारॅलीत ओवैसी बोलत होते. समाजवादी पक्ष मुस्लिम मतदारांना केवळ मतपेढी म्हणून वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला. करहल विधानसभा मतदारसंघातून अखिलेश यादव मुस्लिम उमेदवाराला निवडणुकीचे तिकीट देणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २०२२ मध्ये अखिलेश यादव यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता.

अयोध्येतील राम मंदिराला १२ डिसेंबर रोजी भेट देण्याच्या अखिलेश यादव यांच्या नियोजित कार्यक्रमावरही ओवैसी यांनी टीका केली. त्यांच्या राजकीय भूमिकेत हिंदुत्वाचा प्रभाव दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आगामी निवडणुकीत समाजवादी पक्षाची लाल टोपी आणि भाजप-आरएसएस या दोघांनाही पाठिंबा देऊ नका, असे आवाहन केले.

दरम्यान, ओवैसी यांनी आघाडीचे सहकारी आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केला. आघाडी सत्तेत आल्यास शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी आणि आयआयटीसारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी मांडली. या सभेमुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत दलित-मुस्लिम राजकीय समीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर