पिंपरी-चिंचवडमध्ये हत्यारबंद तीन गुंडांवर पोलिसांची कारवाई; कोयता, पिस्तूल जप्त
कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल यांसह इतर शस्त्रे जप्त
1 मिनट पठन

कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल यांसह इतर शस्त्रे जप्त
पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहराच्या विविध भागात बेकायदेशीर शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल यांसह इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आर्म्स अॅक्ट (शस्त्र कायदा) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. एका कारवाईत पोलिसांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या एका गुंडाला बेकायदेशीर शस्त्रासह अटक केली आहे.

तडीपार गुंडाला निगडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
निगडी पोलिसांनी आकुर्डी येथील क्रांतीनगर भागात सार्वजनिक रस्त्यावर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका तडीपार आरोपीला अटक केली. गोपाल अंकुश हळनोर (२५, रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तपासात समोर आले की, आरोपीला जानेवारी २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो परवानगीशिवाय शहरात फिरत होता.
थार गाडीत कोयता बाळगून धमकावणारा तरुण गजाआड
दापोडी पोलिसांनी फुगेवाडी परिसरात एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीत कोयता बाळगून लोकांना धमकावणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. मानव भीमराव पंडित (२१, रा. मोशी) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी आपल्या गाडीत लोखंडी कोयता घेऊन सार्वजनिक रस्त्यावर लोकांना घाबरवत होता. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि शस्त्र जप्त केले.
चाकणमध्ये देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त
चाकण उत्तर पोलिसांनी चक्रेश्वर रोड परिसरात एका तरुणाला बेकायदेशीर देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली. गौरव मच्छिंद्र डोंगरे (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले असून, त्याची एकूण किंमत सुमारे ५१ हजार रुपये आहे. आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यासह प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
