मुख्य सामग्री पर जाएँ

PMRDA : बनावट पीएमआरडीए कागदपत्रांच्या आधारे २२ खरेदीखतांची नोंद; २१ जणांविरुद्ध आंबेगाव पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

3 मिनट पठन

Pmrda

PMRDA : नर्हे, नांदेड व धायरी परिसरातील जमिनींच्या व्यवहारांत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस; सह दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून बिल्डर, डेव्हलपर्स आणि मिळकत खरेदीदारांवर कायदेशीर बडगा.

पुणे, महाराष्ट्र मिरर

PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच पुणे महानगरपालिकेच्या बनावट विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटापत्रांचा पद्धतशीरपणे गैरवापर करून तब्बल २२ खरेदीखत दस्त नोंदवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात २१ बिल्डर, डेव्हलपर्स आणि मिळकत खरेदीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हवेली दत्तनगर येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयातील सह दुय्यम निबंधक रविंद्र नामदेव कोळी यांनी यासंदर्भात अधिकृत फिर्याद दिली असून, या धडक कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील महसूल व नोंदणी वर्तुळात मोठी चलबिचल सुरू झाली आहे. pmrda  ambegaon fake documents crime

पोलिसांनी आणि महसूल विभागाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर प्रकार जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला. हवेली दत्तनगर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात काही संशयास्पद आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदवले जात असल्याची पक्की माहिती रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली होती.

त्यांनी या संदर्भात सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल करत कसून चौकशीची मागणी केली होती. या अर्जात नमूद करण्यात आले होते की, काही बिल्डरांनी त्यांच्या मिळकतींच्या आणि सदनिकांच्या खरेदीखतांसाठी पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेची खोटी कागदपत्रे जोडली आहेत. PMRDA

या तक्रारीची गंभीर दखल घेत सह दुय्यम निबंधक कार्यालयाने तातडीने हालचाली करत पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार केला. दोन्ही प्राधिकरणांच्या बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आलेले पडताळणी अहवाल अत्यंत थक्क करणारे आणि धक्कादायक होते.

या अहवालांनुसार, संबंधित विकासक, डेव्हलपर्स व खरेदीदारांनी दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केलेली विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र व भोगवटापत्रे ही पूर्णपणे बनावट, खोट्या सही-शिक्यांच्या आधारे तयार केलेली असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही अधिकृत प्राधिकरणाने ही कागदपत्रे जारी केली नव्हती, हे स्पष्ट झाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली. PMRDA

प्राथमिक तपासात असे समोर आले की, साई स्वराज डेव्हलपर्स, शिवाय असोसिएट्स, व्यंकटेश डेव्हलपर, श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, श्री डेव्हलपर्स आणि राजलक्ष्मी डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्ससह अन्य काही प्रमुख संशयितांनी नर्हे (सर्वे नं. २३/१, ३०, ८, २४), नांदेड (सर्वे नं. २५) आणि धायरी (सर्वे नं. ५४, ५६) या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांमधील जमिनींच्या आणि बांधकामांच्या व्यवहारांसाठी या बोगस कागदपत्रांचा पद्धतशीर वापर केला. आरोपींनी आपापसात संगनमत करून एकूण २२ खरेदीखत दस्त कायदेशीर मंजुरी असल्याचा बनाव करून नोंदवून घेतले आणि शासनाची व नागरिकांची फसवणूक करण्यात आली.

NEET : पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उसळला जनसागर!

या सर्व प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने, सह दुय्यम निबंधक रविंद्र नामदेव कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत पत्र व पुरावे देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. या मागणीनुसार आंबेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कडक कलमांन्वये आणि नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक भोजलिंग विष्णू डोळमिस यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणते अधिकारी, मध्यस्थ किंवा दलाल सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे. PMRDA

Pune Traffic News : पुणेकरांना आज पर्यायी मार्गाचा वापर करा

या प्रकरणात सचिन अशोकराव पाटील, महेश नामदेव कुडले, ज्ञानोबा विजयकुमार गुरुडे, सुधीर अशोक पाटील, मंगेश बाळासाहेब बेलदरे, दत्तात्रय गोपाळ पालकर, अनिल शंकर हाके, अशोक शाहुराव घांडगे, देवेंद्र शंकर अनमल, श्वेता देवेंद्र अनमल, ओंकार देवेंद्र अनमल, गायत्री निलेश अंकम, स्नेहा देवेंद्र अनमल, संतोष गणपत वाल्हेकर, विनोद खंडुजी पोकळे, सौ. अमिता प्रसाद कदम, देविदास राजू चव्हाण, विक्रम भानुदास बेनकर, निखील देविदास बेलदरे, तुषार एकनाथ धुमाळ आणि निखील राजेंद्र काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहराच्या उपनगरांमध्ये विशेषतः नर्हे, नांदेड, धायरी, आंबेगाव आणि कात्रज परिसरात गेल्या काही वर्षांत जमिनींचे व फ्लॅट्सचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या रियल इस्टेटच्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी काही अनाधिकृत भूमाफिया आणि बिल्डरांनी पीएमआरडीए व महापालिकेच्या नावाने बनावट एनओसी व कागदपत्रे तयार करण्याचे समांतर रॅकेट चालवल्याचे बोलले जात आहे. PMRDA

या कठोर कायदेशीर कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, यापुढे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करताना कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत. नागरिकांनी कोणतीही मिळकत खरेदी करताना तिची कायदेशीर वैधता आणि अधिकृतता काळजीपूर्वक तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारંवार करण्यात येत आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें