PMC PMPL NEWS : पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत प्रशासन धारेवर
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC PMPL NEWS : पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्वपूर्ण घटक असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावर सोमवारी (दि.२०) महापालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांनी अक्षरश: हल्लाबोल केला.
2 मिनट पठन

नगरसेवकांचा विविध प्रश्नांवरून हल्लाबोल
३० कोटींची तूट ५०० कोटींवर
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC PMPL NEWS : पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्वपूर्ण घटक असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावर सोमवारी (दि.२०) महापालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांनी अक्षरश: हल्लाबोल केला. ३० कोटी रुपयांपासून सुरू झालेली पीएमपीची तूट आता ५०० कोटी रुपयांवर पोहोचली असताना अधिकारी नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.PMC PMPL NEWS

भ्रष्टाचार, वादग्रस्त पदोन्नती, नादुरुस्त बस, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, अपुऱ्या सुविधा आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
महापालिकेकडून सन २०२५-२६ मधील संकलित तुटीपोटी पीएमपीला ४७४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, आर्थिक मदतीपेक्षा पीएमपीच्या ढिसाळ कारभारावरच सभागृहात जोरदार चर्चा रंगली.PMC PMPL NEWS
पीएमपी ही आजारी संस्था झाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका दरवर्षी जवळपास ९०० कोटी रुपये तुटीपोटी देत आहेत. तरीही सेवा सुधारत नाही. काही मोजक्या अधिकाऱ्यांनी पूर्वी पीएमपी नफ्यात आणली होती; मात्र त्यानंतरच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला पुन्हा तोट्यात ढकलले, अशी टीका नगरसेवक हरदास चरवड यांनी केली.
नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी पीएमपीच्या आर्थिक कारभाराचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी करत, तूट वाढतच आहे, पण त्यामागची कारणे कधीच समोर येत नाहीत. प्रत्येक आर्थिक निर्णयाचे ऑडिट झाले पाहिजे. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी केली.PMC PMPL NEWS

सभागृहात भ्रष्टाचाराचाही मुद्दा ऐरणीवर आला. नगरसेवक अजित घुले यांनी आचारसंहितेच्या काळात नियम डावलून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करत, तीन ते आठ लाख रुपये घेऊन पदोन्नती दिल्याची चर्चा होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
नगरसेवकांनी बससेवेच्या दुरवस्थेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. बस वारंवार नादुरुस्त होणे, बसथांब्यांवरील गैरसोयी, चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, मेट्रोसाठी अपुरी फीडर सेवा, स्मार्ट बसथांब्यांची दुरवस्था आणि जाहिरात ठेकेदारांवर कारवाईचा अभाव यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.PMC PMPL NEWS
पीएमपीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्नही सभागृहात ऐरणीवर आले. पेन्शन, आरोग्य सुविधा, वैद्यकीय बिलांची परतफेड, वारसा नोंदणी आणि अंशदायी योजनेचे लाभ वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याची तक्रार करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. “महापालिका शेकडो कोटी रुपयांची मदत करते, पण आयुष्यभर सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत हक्कही मिळत नाहीत,” अशी टीका करण्यात आली.
सभेत केलेल्या मागण्या
महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रभावी उपाययोजना, छोट्या बसांची खरेदी, नव्या डेपोची उभारणी, शववाहिका सेवा पुन्हा सुरू करणे, बसथांब्यांवर डिजिटल माहिती फलक आणि शहरभर एकसमान बसथांबे उभारण्याच्या मागण्याही सभागृहात करण्यात आल्या.PMC PMPL NEWS
पीएमपी प्रशासन शुक्रवारी होणाऱ्या सभेत खुलासा करणार
आर्थिक तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीवर वाढता भार पडत असताना पीएमपी प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारण्याची वेळ आल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. दरम्यान, ही सभा तहकूब करण्यात आली असून शुक्रवारी सभा होणार असून पीएमपी प्रशासनाकडून खुलासा केला जाणार आहे.
PMC PMPL NEWS
