मुख्य सामग्री पर जाएँ

PMC: अडीच कोटींचा चुराडा! जंगली महाराज रस्त्यावरील ‘ते’ मेकॅनिकल पार्किंग अखेर पाडणार

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

pmc

PMC : छत्रपती संभाजी उद्यान परिसराजवळ तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा बहुमजली यांत्रिक वाहनतळ अखेर जमीनदोस्त

पुणे, महाराष्ट्र मिरर

PMC : शहरातील वाढत्या पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने लाखो-कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पांची काय दुर्दशा होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरील मेकॅनिकल पार्किंग. छत्रपती संभाजी उद्यान परिसराजवळ तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा बहुमजली यांत्रिक वाहनतळ अखेर जमीनदोस्त केला जाणार आहे. योग्य देखभाल आणि तांत्रिक अभावामुळे वर्षानुवर्षे बंद असलेला हा लोखंडी सांगाडा आता पूर्णपणे पाडण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. ( PMC jm road mechanical parking demolition )

पुणेकरांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी हा हायटेक प्रकल्प उभा करण्यात आला होता. मात्र, महापालिकेला या प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्ती आणि संचालनासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा एकही ठेकेदार मिळाला नाही. परिणामी, हा प्रकल्प कधी प्रत्यक्षात सुरूच होऊ शकला नाही. या रखडलेल्या प्रकल्पामुळे आणि देखभालीच्या अभावामुळे संपूर्ण लोखंडी स्ट्रक्चर गंजून गेले असून, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. PMC

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन

महापालिकेने केलेल्या तांत्रिक पाहणीत हे स्पष्ट झाले की, हा जसाच्या तसा प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रचंड मोठा खर्च करावा लागणार आहे. मात्र, त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न आणि दुरुस्तीचा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे प्रशासनाने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य (अर्थिकदृष्ट्या तोट्याचा) घोषित केला. महापालिका आयुक्तांनी २१ मे २०२६ रोजी या लोखंडी स्ट्रक्चरला हटविण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मेट्रोचाही वापरास नकार
छत्रपती संभाजी उद्यानालगतच महामेट्रोचे स्थानक असल्याने, हे मेकॅनिकल पार्किंग मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी वापरण्यात यावे, याबाबत गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, मेट्रो प्रशासनानेही या प्रस्तावाला नकार दिला.

याचे कारण म्हणजे, हे जुने पार्किंग स्ट्रक्चर केवळ जुन्या आणि लहान आकाराच्या चारचाकी वाहनांसाठी डिझाइन केले गेले होते. आजच्या युगात रस्त्यावर धावणाऱ्या मोठ्या आकाराच्या गाड्या (SUV इ.) या यंत्रणेत बसू शकणे अशक्य आहे. तसेच, दुरुस्ती करून वापरला तरी या पार्किंगची क्षमता कमालीची घटणार होती. अखेर सर्व बाबींचा विचार करून महापालिकेने हा प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्याचा अंतिम निर्णय घेतला.

Crime News : पुणे हादरले! घोरपडी पेठ पोलीस चौकीसमोरच दिवसाढवळ्या गोळीबार

धोकादायक ठरलेला हा लोखंडी सांगाडा लवकरात लवकर हटवण्यासाठी महापालिकेने १९ मे २०२६ रोजी ‘बी-२’ पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत एकूण सात कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी चार कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या.

स्पार्कटेक इंजिनिअरिंग’ (Sparktech Engineering) या कंपनीने जीएसटीसह प्रति मेट्रिक टन २९,०० रुपये असा सर्वात कमी दर सादर केला. महापालिकेने ही सर्वात कमी निविदा स्वीकारत संबंधित ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला आहे. समितीची औपचारिक मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. pmc

अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही योग्य नियोजनाच्या अभावी पुणेकरांच्या पाश्वाभूमीवरील एक महत्त्वाचा सुविधा प्रकल्प अखेर भंगारात निघाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काही महिन्यांपूर्वी, मॅकेनाईज्ड पार्किंगबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली होती.


पालिकेचा हा निर्णय म्हणजे उशीरा सुचलेल शहाणपण. या पुढील काळात कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना योग्य विचार करावा. भविष्यात अशाप्रकारचे पांढरे हत्ती महापालिकेने पोसू नयेत. सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करावी.
संदीप खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें