PCMC NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये जनक्षोभ; संतापलेल्या नागरिकांचा आयुक्तांना घेराव
पहिल्याच दिवशी वेळ कपात करून 'साहेब' बैठकीत व्यस्त
2 मिनट पठन

पहिल्याच दिवशी वेळ कपात करून 'साहेब' बैठकीत व्यस्त
पिंपरी-चिंचवड PCMC NEWS: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या 'हुकूमशाही' आणि 'जनविरोधी' कारभाराविरुद्ध शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे हे ज्यांचे आद्य कर्तव्य आहे, त्याच आयुक्तांनी नागरिकांच्या भेटीची वेळ आणि दिवस अत्यंत जाचकपणे कमी केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या नव्या कपात केलेल्या वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवशी आयुक्तांनी सामान्य जनतेला भेटण्यास साफ नकार दिला, ज्यावरून पालिका वर्तुळात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'आयुक्त नेमके कोणासाठी? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी की जनतेसाठी?' असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.PCMC NEWS

तीन दिवसांवरून थेट दोन तास, जनतेची नाकेबंदी
यापूर्वी नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस मिळत होते. मात्र, आयुक्त सूर्यवंशी यांनी त्यामध्ये एप्रिल महिन्यात मोठी कपात केली. आता नागरिकांना अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना भेटण्यासाठी आठवड्यातील केवळ मंगळवार आणि गुरुवार हे दोनच दिवस आणि तेही दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी फक्त दोन तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, "भेटीच्या या राखीव वेळेत कोणत्याही अंतर्गत बैठका किंवा दौरे आयोजित करू नयेत," असा अधिकृत आदेश स्वतः आयुक्तांनीच दिला होता. मात्र, नियमांची ही ऐशीतैशी खुद्द आयुक्तांनीच करून दाखवली.PCMC NEWS
पहिल्याच दिवशी गैरहजेरी अन् टोलवाटोलवी; सुरक्षारक्षकांशी हुज्जत
मंगळवारी नव्या नियमानुसार नागरिक दुपारी ४ वाजल्यापासूनच आयुक्तांच्या दालनाबाहेर चकरा मारत होते. दूरवरून आलेल्या हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, आयुक्तांचे दर्शन काही होईना. नागरिकांना भेटीसाठी दिली जाणारी टोकन चिठ्ठी स्वीकारणेही प्रशासनाने तडकाफडकी बंद केले. आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर साखळदंड लावण्यात आला होता. तासन्तास ताटकळलेल्या संतप्त नागरिकांनी शेवटी तो साखळदंड काढण्याची मागणी केली, ज्यावरून सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये मोठी हुज्जत झाली.
बैठकीचे ढोंग? सुरक्षारक्षकांच्या गराड्यात काढला पळ
सायंकाळी ५ च्या सुमारास आयुक्त सूर्यवंशी हे पालखी सोहळा नियोजनाच्या बैठकीचे कारण पुढे करत आपल्या दालनातून बाहेर पडले. आधीच संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना थेट घेराव घातला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला. मात्र, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याचे टाळत आयुक्त सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून तरातरा निघून गेले. केवळ सामान्य जनताच नाही, तर सत्ताधारी पक्षाचे दोन नगरसेवकही तासभर प्रतीक्षा कक्षात बसून होते, त्यांनाही डावलून आयुक्त निघून गेले.PCMC NEWS
खालचे अधिकारी दाद देत नाहीत, वरचे भेटत नाहीत!
"आमची छोटी-छोटी कामे असतात. पालिकेचे खालचे अधिकारी दाद देत नाहीत, लाचखोरी आणि दिरंगाईमुळे आम्हाला आयुक्तांच्या दारात यावे लागते. त्यातही आता आठवड्यातून केवळ दोनच दिवस आणि दोनच तास वेळ ठेवून आमची कोंडी का केली जात आहे? आणि राखीव दिवशी बैठका न घेण्याचा नियम असताना स्वतः आयुक्त बैठका कशाला लावतात?" अशा शब्दांत उपस्थित नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप झेलणाऱ्या पिंपरी-चिंचवड पालिकेचा कारभार पारदर्शक करण्याच्या गप्पा मारणारे आयुक्त प्रत्यक्षात मात्र जनतेपासून पळ काढत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. या गंभीर विषयावर पत्रकारांनी आयुक्त सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, नेहमीप्रमाणे त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.PCMC NEWS
सामान्य जनतेच्या करावर चालणाऱ्या पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आता पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
PCMC NEWS
