मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : मालमत्ता कर कमी करण्यासाठी सव्वा लाखाची लाच

पुणे, महाराष्ट्र मिरर : इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

मालमत्ता कर कमी करण्यासाठी सव्वा लाखाची लाच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात; सांगवीत १ लाख २० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले
मालमत्ता कर कमी करण्यासाठी सव्वा लाखाची लाच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात; सांगवीत १ लाख २० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Pune Crime : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात; सांगवीत १ लाख २० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

पुणे, महाराष्ट्र मिरर : इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. सांगवीतील आनंदनगर परिसरात गुरुवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

उमेश सुब्रय कुटे (वय ३७) असे कारवाई करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. कुटे हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील कर आकारणी व करसंकलन विभागीय कार्यालयात वर्ग-३ लिपिक म्हणून कार्यरत असल्याचे एसीबीने म्हटले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

या प्रकरणातील ५९ वर्षीय तक्रारदाराने पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा खरेदी करून त्यावर तीन मजली इमारत बांधली आहे. या इमारतीच्या नवीन मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात अर्ज केला होता.

या अर्जाच्या अनुषंगाने कुटे याने इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ रुपये होईल, असे तक्रारदाराला सांगितल्याचा आरोप आहे. हा कर कमी करून वार्षिक ५० हजार रुपयांच्या आत आणून देण्याचे सांगत त्यासाठी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. चर्चेनंतर ही रक्कम १ लाख ३० हजार रुपये करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी २ सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी (दि. ३) तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान कुटे याने तक्रारदाराच्या इमारतीचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी पंचासमक्ष १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडीनंतर १ लाख २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

लाचेची मागणी झाल्याची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पुणे युनिटने सापळा रचला. सांगवीतील आनंदनगर येथील स्विमिंग टँक रोड परिसरात दुपारी दोनच्या सुमारास कुटे याने तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

शेयर करें