मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यातील आरटीओ चौकात ‘नो राईट टर्न’

शनिवारपासून वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

पुण्यातील आरटीओ चौकात ‘नो राईट टर्न’

शनिवारपासून वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे: पुणे शहरातील बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या आर.टी.ओ. चौक आणि शाहीर अमर शेख चौक येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आर.टी.ओ. चौकातून उजवीकडे वळण्यास (राईट टर्न) मनाई करण्यात आली असून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपाचे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे आदेश शनिवारपासून (दि. २३ मे) लागू करण्यात आले आहेत.

तस्वीरें · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत.

वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे आहेत:
१) उजवीकडे वळण्यास बंदी (राईट टर्न बंद):
शाहीर अमर शेख चौकाकडून येणाऱ्या वाहनांना आर.टी.ओ. चौकातून उजवीकडे वळून येरवडा, रुबी हॉल आणि जहांगीर चौकाकडे जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

२) पर्यायी मार्ग (यु-टर्न):
शाहीर अमर शेख चौकाकडून येणारी वाहतूक आर.टी.ओ. चौकातून डावीकडे वळण घेऊन सरळ १०० मीटर पुढे जाईल. या वाहनांना संगम ब्रिजच्या अलीकडे योग्य अंतरावर ‘यु-टर्न’ (U-Turn) घेऊन पुन्हा येरवडा, रुबी हॉल आणि जहांगीर चौकाकडे इच्छित स्थळी जाता येईल.

३) ‘नो पार्किंग’ झोन (वाहन उभे करण्यास मनाई):
आर.टी.ओ. चौकातील कोको पेट्रोल पंपापासून ते संगम ब्रिजच्या दरम्यान किंवा रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, याकरिता कोको पेट्रोल पंप ते संगम ब्रिज दरम्यानचा ३०० मीटरचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
४) अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी बदल:
अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौकातून येऊन संगम ब्रिजवरून आर.टी.ओ. चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी डाव्या बाजूच्या पुलाचा (ब्रिज) वापर करणे बंधनकारक राहील.

नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या
वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणलेल्या या बदलांबाबत नागरिकांना काही सूचना अथवा हरकती नोंदवायच्या असल्यास त्यांनी २३ मे २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत लेखी स्वरूपात आपल्या हरकती नोंदवाव्यात. या सूचना/हरकती ‘पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिसजवळ, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे’ या कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने (अग्निशामक दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) वगळून या बदलांबाबतचे अंतिम आदेश निर्गमित केले जातील.

पुणे न्युज

शेयर करें