Nitesh Karale : नागपूर पदवीधर निवडणुकीत नितेश कराळे यांना 24 हजारांहून अधिक मते; हकालपट्टीनंतर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
•"अशी कोणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनीही पक्षावर अशी वेळ आणू नये," असा सूचक उच्चार करत विद्या चव्हाणांनी मांडली भूमिका
1 मिनट पठन

•"अशी कोणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनीही पक्षावर अशी वेळ आणू नये," असा सूचक उच्चार करत विद्या चव्हाणांनी मांडली भूमिका
नागपूर :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आणि लक्षवेधी ठरलेले नितेश कराळे (कराळे मास्तर) यांनी तब्बल 24,249 मते मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मतदानापूर्वीच पक्षाचे अनुशासन मोडल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर आता शरद पवार गटाकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कराळे यांच्या कामगिरीवर आणि पक्षाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना, "अशी कोणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनीदेखील पक्षावर अशी वेळ आणू नये," अशी सावध भूमिका मांडली आहे.
तिरंगी लढतीत भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर, कराळे ठरले गेमचेंजर
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात मुख्य लढत होत असताना, नितेश कराळे यांनी घेतलेली 24 हजार मते निर्णायक ठरली आहेत. पक्षाने कारवाई केल्यानंतर नितेश कराळे सोशल मीडियावर अत्यंत भावूक झाले होते, ज्याची राज्यभर चर्चा रंगली होती. दरम्यान, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील विजयावर बोलताना विद्या चव्हाण यांनी, ज्यांना राष्ट्रवादी संपल्याचे वाटत होते, त्यांना महाराष्ट्रात आजही शरद पवारांचा सुशिक्षित वर्गात दबदबा कायम असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिल्याचे म्हटले आहे.
