Navi Mumbai Police : गोमांस तस्करी करणाऱ्या टोळीवर नवी मुंबई पोलिसांचा 'मोक्का'! पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई
Navi Mumbai Police Latest News : टोळीप्रमुख यासीन शेखसह 4 जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा गुन्हा; रत्नागिरीतून मुंबईत मांस पुरवणाऱ्या साखळीचा पर्दाफाश
2 मिनट पठन

Navi Mumbai Police Latest News : टोळीप्रमुख यासीन शेखसह 4 जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा गुन्हा; रत्नागिरीतून मुंबईत मांस पुरवणाऱ्या साखळीचा पर्दाफाश
नवी मुंबई (पनवेल) :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत गोवंश हत्या आणि मांस तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गोमांस तस्करीच्या गुन्ह्यात, आरोपींच्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA - मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्तांच्या मान्यतेनंतर या टोळीवर हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
झायलो कारमधून तस्करीचा असा झाला उलगडा
23 डिसेंबर 2025 रोजी सकाळीच्या सुमारास, पनवेल शहर पोलिसांना एका झायलो कारमधून गोमांस मुंबईकडे नेले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून झायलो कार (MH 04 DY 2421) ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता त्यात गोवंश जातीच्या 4 बैलांची कत्तल करून आणलेले मांस मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
रत्नागिरी ते मुंबई: तस्करीचे जाळे
पोलिसी तपासात या तस्करीचे धागेदोरे थेट कोकणापर्यंत पोहोचले. अटक करण्यात आलेले आरोपी यासीन मोईनुद्दीन शेख (शिवाजीनगर), पासु उस्मान कुरेशी (मानखुर्द) आणि मोहंमद अली अकबर अली शाह (अँटॉप हिल) यांनी हे मांस रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ (ता. मंडणगड) येथून आणल्याची कबुली दिली. तिथला स्थानिक मुख्य सूत्रधार गुलामगौस नसरूद्दीन मुकादम याने हे गोमांस पुरवल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.
'मोक्का' लावण्यामागचे कारण
टोळीप्रमुख यासीन मोईनुद्दीन शेख याने आपल्या साथीदारांसह संघटितपणे दहशतीचा वापर करून हे बेकायदेशीर कृत्य सातत्याने सुरू ठेवल्याचे तपासात समोर आले. या टोळीवर इतर विविध पोलीस ठाण्यांतही गंभीर गुन्हे दाखल आहेत. हिंसाचार, धाकदपटशा आणि अवैध मार्गाने परिसरात वर्चस्व निर्माण करण्याचा या टोळीचा प्रयत्न असल्याने, सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या परवानगीने या गुन्ह्यात 'मोक्का' (MCOCA) कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले हे करत आहेत. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
