Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांचा रबाळे एमआयडीसी परिसरात 'मास रेड'! कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 20 जणांवर गुन्हे, पिस्टलसह दारू आणि गुटखा जप्त
Navi Mumbai Police Latest News : 115 हून अधिक पोलिसांच्या ताफ्याने पिंजून काढला एमआयडीसीचा परिसर; 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले
1 मिनट पठन

Navi Mumbai Police Latest News : 115 हून अधिक पोलिसांच्या ताफ्याने पिंजून काढला एमआयडीसीचा परिसर; 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले
नवी मुंबई/रबाळे :- नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या 'झिरो टॉलरन्स' मोहिमेचा भाग म्हणून रबाळे एमआयडीसी परिसरात बुधवारी (11 मार्च 2026) भव्य कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या धडक कारवाईत पोलिसांनी एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले असून, एकूण 20 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. Navi Mumbai Police Latest News
पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (परिमंडळ-01) यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिघा, ईश्वरनगर, चिंचपाडा, रामनगर, आंबेडकरनगर आणि महापे एमआयडीसी यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. Navi Mumbai Crime News
कारवाईचे प्रमुख मुद्दे
शस्त्रास्त्र जप्ती: तपासणीदरम्यान एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले असून त्याच्यावर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अवैध धंदे: अवैध दारू विक्री (5 केसेस) आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. तसेच अंमली पदार्थ सेवन (NDPS) करणाऱ्या 3 जणांना आणि अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेतले.
सराईत गुन्हेगार: या मोहिमेत अभिलेखावरील 12 गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली, तर 15 फरार आरोपींचा शोध घेतला गेला. 5 वॉरंटमधील 7 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
इतर कारवाया: अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि कोटपा अधिनियमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहतूक आणि सुरक्षा तपासणी
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी परिसरातील 339 वाहनांची कसून तपासणी केली, त्यापैकी 72 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 9 हॉटेल आणि लॉजेसची झडती घेऊन संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे, पोलीस निरीक्षक कल्पना जाधव आणि त्यांच्या पथकाने ही मोठी मोहीम यशस्वी केली. नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
