मुख्य सामग्री पर जाएँ

Naresh Mhaske : एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही! ; प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून खासदार नरेश म्हस्केंचा विरोधकांना सज्जड दम

•उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचा आक्रमक पवित्रा; "याला धमकी समजा किंवा आव्हान," म्हणत म्हस्केंकडून विरोधकांना थेट इशारा

व
विवेक

1 मिनट पठन

Naresh Mhaske

•उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचा आक्रमक पवित्रा; "याला धमकी समजा किंवा आव्हान," म्हणत म्हस्केंकडून विरोधकांना थेट इशारा

ठाणे :- ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही बाजूंचे नेते आता आमनेसामने आले आहेत. पूर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य सूत्रधारांवर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणाऱ्या टिकेला आक्रमक प्रत्युत्तर देत शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेत विरोधकांना अत्यंत कडक शब्दांत वॉर्निंग दिली आहे. "उद्याच्या आंदोलनात कोणी येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चुकीचे आरोप केले किंवा त्यांना लक्ष्य केले, तर तो नेता ठाण्यातून सुखरूप परत जाणार नाही," असे सांगत म्हस्केंनी याला हवी तर धमकी समजा, असे जाहीर आव्हान दिले आहे.

"मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरू"

विरोधकांवर कडाडून टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले की, काही राजकीय पक्ष आणि नेते या दुर्दैवी घटनेचा वापर करून केवळ राजकारण करत आहेत आणि 'मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे' काम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कोणतीही कसूर सोडणार नाही असे स्पष्ट केले असतानाही जाणीवपूर्वक त्यांच्यावर लांछन लावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काल ठाण्यात अनेक तास रस्ते रोखून धरण्यात आले, तेव्हाही आम्ही संयम राखला; परंतु आता शिंदे साहेबांचा अपमान किंवा चुकीचे राजकारण सहन केले जाणार नाही, असे सांगत प्रसंगी जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठाण्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 28 दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार मोकाट असल्याचा आरोप करत मृत कुटुंबीय आणि महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. अशातच खासदार नरेश म्हस्केंच्या या आक्रमक विधानामुळे ठाण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला असून, उद्या आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: BMC 2026 Bonus : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; यंदा मिळणार 32 हजार रुपयांचा सानुग्रह बोनस

शेयर करें