मुख्य सामग्री पर जाएँ

Nagpur News : नागपुरात डीजेच्या दणदणाटाला ‘ब्रेक’

Nagpur News नागपूर : पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटामुळे ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असतानाच नागपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

नागपुरात डीजेच्या दणदणाटाला ‘ब्रेक’! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, बीमलाईट आणि लेझरवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
नागपुरात डीजेच्या दणदणाटाला ‘ब्रेक’! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, बीमलाईट आणि लेझरवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Nagpur News : १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, बीमलाईट आणि लेझरवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Nagpur News नागपूर : पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटामुळे ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असतानाच नागपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात गुरुवार (दि. ३) रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजे लावलेली वाहने, बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला असून, उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश आवाज आणि प्रखर प्रकाशाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या प्रचंड आवाजाची राज्यभर चर्चा झाली. ध्वनीची निर्धारित मर्यादा ओलांडणाऱ्या साउंड सिस्टिम, कानठळ्या बसविणारा आवाज आणि त्यासोबत होणारा लेझर लाईटचा भडिमार यामुळे ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ डीजेच्या आवाजावर निर्बंध घातलेले नाहीत, तर डीजे लावलेली वाहने रस्त्यावर आणण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम किंवा उत्सवांच्या नावाखाली मॉडिफाइड साउंड सिस्टिमच्या माध्यमातून मोठ्या आवाजात संगीत वाजविणाऱ्या आयोजकांना चाप बसणार आहे. त्याचबरोबर बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावरही निर्बंध असल्याने मिरवणुकांमध्ये होणारा प्रखर प्रकाशाचा भडिमार कमी होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास

कर्णकर्कश आवाजाचा परिणाम केवळ कानांवर होत नाही, तर त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच प्रखर लेझर बीममुळे वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उत्सव साजरा करण्याचा अधिकार महत्त्वाचा असला, तरी इतर नागरिकांच्या शांततेचा आणि सुरक्षिततेचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय

आगामी काळात गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजुद्दीनबाबा छब्बीस, श्रीगणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गोत्सवातील आगमन-विसर्जन मिरवणुका होणार आहेत. या काळात विविध प्रकारच्या साउंड सिस्टिम आणि मॉडिफाइड साउंड सिस्टिम वाहनांच्या वापरावरून मंडळांचे पदाधिकारी, आयोजक, संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्यातून तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच कठोर भूमिका घेतली आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

बंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी, आयोजक तसेच डीजेचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या सण-उत्सवांमध्ये ‘आवाजाची ताकद’ दाखविण्यापेक्षा नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आव्हान मंडळांसमोर असणार आहे. पुण्यातील डीजेच्या दणदणाटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी उत्सवांपूर्वीच ‘आवाजावर ब्रेक’ लावला आहे.

शेयर करें