हडपसरमध्ये तरुणावर खुनी हल्ला
तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा
1 मिनट पठन

तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा
पुणे: हडपसरमधील ससाणेनगर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर सिमेंटच्या ब्लॉकने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, काळेपडळ पोलिसांनी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ससाणेनगर, हडपसर येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही घटना रविवारी (ता. ३) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
मोकळ्या मैदानात गाठून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती ससाणेनगरमधील गल्ली क्रमांक ५ मधील हिंगणे बिल्डिंग शेजारील मोकळ्या मैदानात थांबले होते. यावेळी तिथे आलेल्या तीन आरोपींनी जुन्या वादाचे कारण काढून त्यांना गाठले. आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीच्या पतीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
सिमेंटच्या ब्लॉकने केला गंभीर वार
मारहाण सुरू असतानाच, एका आरोपीने फिर्यादीच्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जमिनीवर पडलेला सिमेंटचा जड ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या भीषण हल्ल्यामुळे फिर्यादीचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भरदिवसा झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काळेपडळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
