Mumbai Political News : मुंबईत 'ठाकरे-राज' पुन्हा एकत्र! प्रभाग समितीच्या वाटपावरून रंगलेला वाद मिटला; मनसेला मिळाल्या 'या' महत्त्वाच्या समित्या
MNS Shivsena Latest News : संजय राऊतांच्या 'शिवतीर्थ' भेटीनंतर ठाकरे गटाकडून मनसेच्या अटी मान्य | स्वीकृत नगरसेवक पदाऐवजी मनसेला 'जी नॉर्थ'वर 2 वर्षांची सत्ता | 'वरुण सरदेसाई - संदीप देशपांडे' चर्चेतून युतीचं समीकरण फिक्स
1 मिनट पठन

MNS Shivsena Latest News : संजय राऊतांच्या 'शिवतीर्थ' भेटीनंतर ठाकरे गटाकडून मनसेच्या अटी मान्य | स्वीकृत नगरसेवक पदाऐवजी मनसेला 'जी नॉर्थ'वर 2 वर्षांची सत्ता | 'वरुण सरदेसाई - संदीप देशपांडे' चर्चेतून युतीचं समीकरण फिक्स
मुंबई :- मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाकरे गटाने एक पाऊल मागे घेत मनसेला अधिकच्या प्रभाग समित्या देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेत तटस्थ राहण्याचा पवित्रा घेतलेल्या मनसेने आता ठाकरे गटाला साथ देण्याचे निश्चित केले असून, दोन्ही पक्षांमधील मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संजय राऊतांची मध्यस्थी आणि 'शिवतीर्थ'वर खलबतं
गेल्या काही दिवसांपासून मनसेला डावलले जात असल्याच्या चर्चांमुळे राज ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या होत्या. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. सुमारे 25 मिनिटे चाललेल्या या चर्चेत युतीची पुढील दिशा ठरली. त्यानंतर वरुण सरदेसाई आणि मनसे नेत्यांच्या बैठकीत सत्तेचे नवीन सूत्र ठरवण्यात आले.
असे आहे सत्तेचे 'फॉर्म्युला' - मनसेच्या वाट्याला काय?
मनसेने स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली होती, मात्र त्याऐवजी अधिकच्या प्रभाग समित्या देण्याचे ठाकरे गटाने मान्य केले. यानुसार:
जी नॉर्थ (दादर-माहिम): ही महत्त्वाची प्रभाग समिती मनसेला 2 वर्षांसाठी मिळाली आहे.
एफ साऊथ, पी पूर्व-पश्चिम आणि एस-टी विभाग: या समित्यांचे अध्यक्षपद प्रत्येकी 1 वर्षासाठी मनसेकडे राहणार आहे.
"एकजूट महत्त्वाची": वरुण सरदेसाई
या निर्णयाबाबत बोलताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, "मुंबई मनपा निवडणूक आम्ही एकत्र लढलो होतो आणि कामकाजही एकत्रच व्हावे ही आमची इच्छा होती. काही समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाटून घेतली जातील. एखाद्या पदापेक्षा आमची एकजूट मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे."
मनसेची सकारात्मक भूमिका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही चर्चेवर समाधान व्यक्त केले आहे. "आम्ही कोणतीही वेगळी भूमिका घेतली नव्हती, केवळ प्रभाग समित्यांच्या वाटपावर चर्चा सुरू होती. ही चर्चा आता सकारात्मकरीत्या पूर्ण झाली असून, वॉर्डांच्या वाटपाचा निर्णय आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू," असे त्यांनी स्पष्ट केले.
