मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai Holi News : मुंबईत धुळवडीला गालबोट; वडाळ्यात तरुणाची हत्या, तर रंगांचा खेळ खेळताना 45 जण जखमी

Mumbai Latest Crime News : मारहाणीच्या घटनांमुळे जखमींच्या संख्येत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण घटले | डोळ्यांना दुखापत आणि मद्यपानामुळे अनेकांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली

व
विवेक

1 मिनट पठन

Mumbai Holi News : मुंबईत धुळवडीला गालबोट; वडाळ्यात तरुणाची हत्या, तर रंगांचा खेळ खेळताना 45 जण जखमी

Mumbai Latest Crime News : मारहाणीच्या घटनांमुळे जखमींच्या संख्येत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण घटले | डोळ्यांना दुखापत आणि मद्यपानामुळे अनेकांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली

मुंबई :- रंग आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघालेल्या मुंबईत मंगळवारी धुळवडीचा आनंद साजरा होत असतानाच काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. वडाळा परिसरात झालेल्या एका टोकाच्या वादात 18 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये दिवसभरात 45 जखमींची नोंद झाली असून, यामध्ये रंगामुळे होणारे त्रास, पडल्यामुळे झालेली दुखापत आणि हाणामारीत जखमी झालेल्यांचा समावेश आहे.

वडाळ्यात तरुणाचा भीषण अंत

धुळवडीच्या उत्साहाला सर्वात मोठे गालबोट वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात लागले. येथील तुषार उंजनवाल (18 वय) या तरुणाला होळी खेळत असताना 8 ते 10 जणांच्या टोळक्याने आयमॅक्स सिनेगृहाजवळ गाठले आणि बेदम मारहाण केली. बोथट शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने शीव (सायन) रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी
मुंबईतील प्रमुख रुग्णालयांतून मिळालेली आकडेवारी चिंताजनक आहे:

शीव रुग्णालय: येथे मारहाणीतील जखमींसह भांग प्यायल्याने प्रकृती बिघडलेल्या तिघांवर उपचार करण्यात आले.

कूपर रुग्णालय: होळी पेटवताना एक 35 वर्षीय महिला गंभीर भाजली असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

केईएम रुग्णालय: रंगांमुळे त्वचेवर पुरळ उठलेल्या 5 वर्षांच्या मुलासह पडल्यामुळे जखमी झालेल्या चार मुलांवर येथे उपचार झाले.

सेंट जॉर्जेस व जी.टी. रुग्णालय: फोर्ट परिसरात एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली, तर मद्यधुंद अवस्थेत पडून जखमी झालेले आणि रस्ते अपघातातील 7 रुग्णांवर जी.टी. रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत घट, तरीही सतर्कता हवी

यंदा जखमींची संख्या 45 असली तरी, गेल्या वर्षी हा आकडा 93 होता. नैसर्गिक रंगांचा वापर आणि प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आले असले तरी, हाणामारीच्या घटनांनी गालबोट लावले आहे. जे.जे. आणि नायर रुग्णालयांत प्रामुख्याने डोळ्यात रंग गेल्यामुळे आलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शेयर करें