Mumbai Crime News : मुलुंड स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना; वादामुळे पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले, नराधम पतीला सुरतमधून अटक
Mulund Station Latest News : सैन्यात असलेल्या मेव्हण्याला घरात कोंडून रचला क्रूर कट; 36 वर्षीय पत्नीचा जागीच मृत्यू, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
2 मिनट पठन

Mulund Station Latest News : सैन्यात असलेल्या मेव्हण्याला घरात कोंडून रचला क्रूर कट; 36 वर्षीय पत्नीचा जागीच मृत्यू, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
मुंबई :- मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. सततच्या घरगुती वादातून एका पतीने आपल्या 36 वर्षीय पत्नीला चालत्या लोकलसमोर ढकलून देऊन तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपी पती राजुकुमार गुप्ता याला रेल्वे पोलिसांनी सुरतमधून बेड्या ठोकल्या आहेत.
कौटुंबिक वादाचा भयानक शेवट
मृत पुष्पा (36 वय) आणि तिचा पती राजुकुमार यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होते. या जाचाला कंटाळून पुष्पाचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता, जो भारतीय सैन्यात जवान आहे, आपल्या बहिणीला आणि 15 वर्षांच्या भाच्याला उत्तर प्रदेशातील गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. 14 मार्च रोजी हे सर्वजण गावी जाण्यासाठी निघाले होते, मात्र प्रवासापूर्वीच राजुकुमारने हत्येचा कट रचला.
मेव्हण्याला घरात कोंडले आणि स्थानक गाठले
मुलुंड स्थानकाकडे जात असताना कमलेश आपले लष्करी ओळखपत्र (ID Card) घरी विसरल्याचे लक्षात आल्याने तो मुलासह परत गेला. याचाच फायदा घेऊन राजुकुमारने त्या दोघांना बाहेरून कडी लावून घरात कोंडून ठेवले. यानंतर त्याने थेट मुलुंड स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 गाठला, जिथे पुष्पा एकटीच त्याची वाट पाहत उभी होती.
धावत्या लोकलसमोर दिले ढकलून
स्थानकावर पुष्पा दिसताच राजुकुमारने पुन्हा तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. लोकल प्लॅटफॉर्मवर येत असल्याचे पाहून, संधी मिळताच त्याने पुष्पाला मागून जोराचा धक्का देऊन रुळावर ढकलले. लोकल अंगावरून गेल्याने पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने आपल्या लहान मुलाला सोबत घेतले आणि मुंबईतून पळ काढला.
पोलिसांची तत्परता आणि कारवाई
घरात कोंडलेल्या कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने आपली सुटका करून घेतली आणि स्थानकावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत पुष्पा यांचा मृत्यू झाला होता. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे राजुकुमारचा शोध सुरू केला. तो गुजरातच्या सुरतमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
आरोपी राजुकुमार गुप्ता विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
