Mumbai BMC School : मुंबई पालिकेत 'शाळा दत्तक' धोरणावरून हायव्होल्टेज ड्रामा! काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली; ठाकरेंची शिवसेना मात्र अलिप्त
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख आक्रमक | शाळा खासगी संस्थांना देण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी | सभागृहात नगरसेवकांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
1 मिनट पठन

Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख आक्रमक | शाळा खासगी संस्थांना देण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी | सभागृहात नगरसेवकांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
मुंबई :- मुंबई महानगरपालिकेच्या शाळा खासगी आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याच्या निर्णयावरून आज पालिका सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या ठरावाच्या सूचनेवर आज चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.
नेमका वाद कशावरून?
महानगरपालिकेकडून २००७ पासून शाळा दत्तक देण्याचे धोरण राबवले जात आहे. मात्र, काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी या धोरणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या मते, शाळा दत्तक घेणाऱ्या काही संस्था शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करत आहेत. केंद्र सरकारचे नियम आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राथमिक स्तरावर TET उत्तीर्ण शिक्षक अनिवार्य असताना, अशा नियुक्त्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
इमारतींच्या कमतरतेचा मुद्दा
सूचनेत पुढे असेही नमूद करण्यात आले की, पालिकेने आता स्वतःच्या सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पालिकेला स्वतःच्याच शाळा चालवण्यासाठी इमारतींची कमतरता भासत आहे. मग पालिकेच्या इमारती खासगी संस्थांना का द्यायच्या? असा सवाल उपस्थित करत हे दत्तक धोरण तातडीने रद्द करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली.
राजकीय समीकरणे आणि गोंधळ
या सूचनेवर चर्चा सुरू होताच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी धोरणाचे समर्थन करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. यावरून दोन्ही बाजूचे नगरसेवक वेलमध्ये उतरले आणि एकमेकांविरोधात घोषणाबाजी करू लागले. विशेष म्हणजे, नेहमी आक्रमक राहणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना या वादात कुठेही दिसली नाही. ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्या जागेवर बसून शांतपणे हा गोंधळ पाहत होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
