Mumbai news : एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मुंबईत एल्गार; आंदोलक आक्रमक
Mumbai news : मुंबई : अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी प्रलंबित असल्याने मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले.
2 मिनट पठन

Mumbai news : मुंबई : अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी प्रलंबित असल्याने मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले. एससी प्रवर्गातील १३ टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
आंदोलनासाठी आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. मात्र, आंदोलकांनी मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
‘आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे’
भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ काही मोजक्या समाजघटकांना मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचा मुद्दा न्यायालयीन चर्चेत आला असून, एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे गोरखे यांनी म्हटले.
“आम्हाला कोणाच्या ताटातील आरक्षण नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे. आमची लोकसंख्या जितकी, त्यानुसार आम्हाला आरक्षणाचा वाटा मिळावा, ही आमची साधी मागणी आहे,” असे गोरखे यांनी सांगितले.
एससी प्रवर्गातील विविध समाजघटक आता आपल्या हक्कांसाठी जागरूक झाले असून, या मागणीला इतर समाजघटकांचाही पाठिंबा मिळेल, असा दावा त्यांनी केला.
‘शासन निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही’
एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मातंग समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
रमेश कदम नजरकैदेत
दरम्यान, मुंबईतील मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मोर्चात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी कदम यांना सांगितले.
रमेश कदम यांना नजरकैदेत ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी नाराजी व्यक्त करण्यात आली. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची भूमिका कायम असून, त्यामुळे मुंबईतील आंदोलनाचे वातावरण आणखी तापले आहे.
