दौंडमध्ये वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले
प्रतिकार केल्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
2 मिनट पठन

प्रतिकार केल्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
पुणे: दौंड तालुक्यात शेताकडे पायी जात असलेल्या एका ५५ वर्षीय वृद्धेला अडवून अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वृद्धेने धाडसाने चोरट्याशी झटापट करत प्रतिकार केला असता, निर्दयी चोरट्याने तिला थेट जमिनीवर आपटून लाथांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदा सूर्यकांत शितोळे (वय ५५, धंदा- घरकाम, रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(६) आणि ११५(२) नुसार जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १९) सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मौजे खडकी गावच्या हद्दीतील जमीन गट नं. ७२८ मधील शेतात घडली.
असा घडला प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा शितोळे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातील कामे आटपून पायी चालत निघाल्या होत्या. त्या सोलापूर महामार्ग ओलांडून खडकी गावच्या हद्दीतील गट नं. ७२८ मधील शेतात गवत काढण्यासाठी जात होत्या. यावेळी शेतात जात असताना पाठीमागून एक अज्ञात तरुण चालत येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शितोळे यांनी मागे वळून “माझ्या पाठीमागे का आलास?” अशी विचारणा केली असता, त्या चोरट्याने “सॉरी आजी” असे म्हणत त्यांचे लक्ष विचलित केले.
शितोळे काही समजण्याच्या आतच त्या तरुणाने त्यांच्या अगदी जवळ जाऊन डाव्या हाताने त्यांचे तोंड दाबले आणि गळ्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. धाडसी नंदा शितोळे यांनी गप्प न बसता चोरट्याला घट्ट पकडून त्याच्याशी प्रतिकार केला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. वृद्धेने मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केल्याने घाबरलेल्या चोरट्याने त्यांना उचलून थेट जमिनीवर आपटले.
लाथा मारून चोरटा पसार
वृद्धा जमिनीवर पडल्यानंतरही चोरट्याने तिच्या कमरेमध्ये जोरात लाथ मारून तिला जखमी केले. त्यानंतर तो सोलापूर महामार्गाच्या दिशेने पळून गेला. या हल्ल्यात फिर्यादी नंदा शितोळे या जखमी झाल्या आहेत. चोरट्याने ओढून नेलेल्या मंगळसूत्रामध्ये ३३ मणी आणि दोन वाट्या असलेले सोन्याचे मनीमंगळसूत्र होते, ज्याची किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे.
या घटनेमुळे दौंड परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या वृद्धेला मारहाण करून दागिने लुटणाऱ्या या सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण (फुटेज) आणि संशयितांची तपासणी सुरू केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे क्राईम न्यूज
