Washim News : दुष्काळाच्या पाहणीसाठी फडणवीस पुन्हा बांधावर; तीन दिवसांत पहिली अधिसूचना, शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
Washim News : वाशिम : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे.
2 मिनट पठन

Washim News : वाशिम : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यानंतर आज ते अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. येत्या तीन दिवसांत दुष्काळाची पहिली अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच दुष्काळाबाबतचा शासन निर्णयही लवकरच जारी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सरसकट मदतीची ग्वाही
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडून आवश्यक ती पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यात शेतकऱ्यांना अडकवून ठेवण्याचा सरकारचा हेतू नसल्याचे सांगत, नुकसानग्रस्तांना मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली. खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील नुकसानीचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूरमध्ये शेतकरी भावुक
बुधवारी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा परिसरात फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी करपलेली सोयाबीनची पिके आणि कोरड्या विहिरींचे चित्र यावेळी समोर आले. पीक नुकसानीची व्यथा सांगताना काही शेतकरी भावुक झाले. फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.
लातूरमध्ये यंदा पावसाचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत राहिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती १९७२च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाणी आणि चाऱ्यासाठी सरकारचा फोकस
दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक निधी आणि उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील काही महिने आव्हानात्मक असून, या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जुन्या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांनाही दिलासा
यापूर्वी जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनांमधील पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. पीकविमा आणि इतर प्रलंबित प्रश्नांवरही तातडीने कार्यवाही करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, मराठवाड्याच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मविआ सरकारच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्पाला ब्रेक लागला. मराठवाड्याला दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे वेगाने करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. केंद्राकडून मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याची वाट न पाहता राज्य सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
