LPG Gas Cylinder : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा? सोशल मीडियावरील 'त्या' बातम्या खोट्या; पेट्रोलियम मंत्रालयाने केला मोठा खुलासा
LPG Gas Cylinder Latest News : होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे स्पष्टीकरण; एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने घाबरू नका
1 मिनट पठन

LPG Gas Cylinder Latest News : होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे स्पष्टीकरण; एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने घाबरू नका
मुंबई :- पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील निर्बंधांमुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. गॅस बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यासाठी चक्क 35 दिवस लागतील, अशा दाव्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. मात्र, आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या सर्व बातम्या फेटाळून लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
सोशल मीडियावरील '35 दिवसांचा' दावा खोटा
पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगच्या कालावधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. "बुकिंग केल्यानंतर 35 दिवसांनी सिलेंडर मिळेल" अशा आशयाचे मेसेज पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचे आहेत. सध्याची बुकिंग प्रणाली पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
पुरवठा साखळी सुरक्षित; पुरेसा साठा उपलब्ध
पश्चिम आशियातील संघर्षामुळे आयातीवर परिणाम झाल्याचे वृत्त पसरले असले तरी, केंद्र सरकारने खात्री दिली आहे की देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनेही (IOCL) यावर शिक्कामोर्तब केले असून, पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊन अनावश्यक (Panic Booking) रिफिल बुकिंग करू नये, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा
सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने जनतेला सावध केले आहे की, केवळ सरकारी प्रसिद्धीपत्रके किंवा तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
