मुख्य सामग्री पर जाएँ

कर्वेनगरमध्ये तोतया पोलिसांचा धुमाकूळ

सव्वा लाखांचे दागिने लंपास, ज्येष्ठ नागरिकाची हातचलाखीने फसवणूक

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

कर्वेनगरमध्ये तोतया पोलिसांचा धुमाकूळ

सव्वा लाखांचे दागिने लंपास, ज्येष्ठ नागरिकाची हातचलाखीने फसवणूक

पुणे: शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, कर्वेनगर परिसरात एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दागिने कागदात गुंडाळून देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी १ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि अंगठी हातचलाखीने लंपास केली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डहाणूकर कॉलनी (कोथरुड) येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २०४, ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ३) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कर्वेनगरमधील डॉ. आंबेडकर चौकाजवळील पीेमपीएल बसस्टॉपवर घडली.

पोलीस असल्याचे सांगून लावला चुना
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी सकाळी बसची वाट पाहत डॉ. आंबेडकर चौकातील बसस्टॉपवर थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. “पुढे तपासणी सुरू आहे, तुम्ही अंगावरील दागिने काढून पिशवीत किंवा कागदात ठेवा,” असे सांगून त्यांनी फिर्यादींना गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी काढण्यास भाग पाडले.

हातचलाखीने दागिने लंपास
फिर्यादींनी दागिने काढल्यानंतर आरोपींनी ते पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या हातात घेतले. “आम्ही हे तुम्हाला कागदात व्यवस्थित गुंडाळून देतो,” असे सांगत त्यांनी हातचलाखी केली आणि दागिन्यांच्या ऐवजी कागदाची दुसरीच पुडी फिर्यादींच्या हातात दिली. फिर्यादींना काही समजण्याच्या आतच दोन्ही आरोपी तिथून पसार झाले. काही वेळाने पुडी उघडून पाहिली असता, त्यात दागिने नसल्याचे पाहून फिर्यादींना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

वारजे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक भांबेरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेयर करें