मुख्य सामग्री पर जाएँ

फातिमानगरमध्ये घरगड्याचा मालकिणीला ‘चुना’

७ लाखांच्या रोकड आणि दागिन्यांवर डल्ला

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

फातिमानगरमध्ये घरगड्याचा मालकिणीला ‘चुना’

७ लाखांच्या रोकड आणि दागिन्यांवर डल्ला

पुणे: घरातील विश्वासातील नोकरानेच मालकिणीची नजर चुकवून कपाटातून साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख ५ हजार ७६० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फातिमानगरमधील मनीष दर्शन सोसायटीमध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फातिमानगर परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेने यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मनीष दर्शन सोसायटीतील ‘जी’ विंगमध्ये राहतात. त्यांच्याकडे घरकामासाठी असलेल्या नोकराने ८ मार्च ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत ही चोरी केली. फिर्यादी महिला कामात व्यस्त असताना किंवा घराबाहेर असताना संधी साधून आरोपीने बेडरूममधील कपाट उघडले.

कपाटात ठेवलेली ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे मौल्यवान दागिने असा एकूण ७ लाख ५ हजार ७६० रुपयांचा ऐवज नोकराने लंपास केला. काही दिवसांनी कपाटातील रक्कम आणि दागिने गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. नोकरावर संशय आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली. या चोरीत नोकराला अन्य एका साथीदाराने मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वानवडी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ आणि ३(५) नुसार दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घरगुती नोकर कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची संपूर्ण माहिती, आधारकार्ड आणि पोलीस पडताळणी (Police Verification) करून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन वानवडी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Housewife 'scolded' in Fatimanagar

शेयर करें