मुख्य सामग्री पर जाएँ

Health: औषधांच्या किमतींवर नियंत्रणासाठी १ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

रुग्ण हक्क परिषदेचा निर्धार; औषध सुरक्षा आणि रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनट पठन

रुग्ण हक्क परिषद
रुग्ण हक्क परिषद

Health: पुणे, महाराष्ट्र मिरर – महागड्या औषधोपचारांमुळे सर्वसामान्य रुग्णांवर आर्थिक भार वाढत असून, औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी ‘औषध सुरक्षा कायदा’ लागू करावा, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेने केली आहे. तसेच औषधांच्या किमती पाच हजार रुपयांपर्यंत मर्यादित ठेवाव्यात आणि ‘रुग्ण हक्क संरक्षण कायदा’ मंजूर करावा, या मागण्यांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे.

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २४) राज्यव्यापी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यानंतर परिषदचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक शिंदे, पुणे शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी रुग्णांना एक ते दोन लाख रुपयांची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. किडनी प्रत्यारोपणानंतरही दरमहा सुमारे ४० हजार रुपयांची औषधे लागतात. त्यामुळे औषधांसाठी स्वतंत्र अनुदान किंवा अर्थसंकल्पीय तरतूद करावी. कोणत्याही औषधाची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वसामान्यांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत, यासाठी रुग्ण हक्क संरक्षण कायदाही मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. १ डिसेंबरच्या आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेनुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर