दोन वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी नवी मुंबईतून जेरबंद
खराडीत सोन्याचा गंठण गहाण ठेवून केली होती एकाची फसवणूक
2 मिनट पठन

खराडीत सोन्याचा गंठण गहाण ठेवून केली होती एकाची फसवणूक
पुणे: पोल्ट्री व्यवसायासाठी पैसे घेऊन आणि घरगुती कार्यक्रमाच्या बहाण्याने घेतलेले सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपीला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सानपाडा परिसरातून जेरबंद करण्यात आले.

दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, मूळ रा. कोल्हेवाडी, जि. सातारा, सध्या रा. खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान तावरे याने अशाच पद्धतीने अन्य तीन जणांचीही आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
असा केला विश्वासघात
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तावरे याने १८ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादीकडून पोल्ट्री व्यवसायासाठी ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून, एका घरगुती कार्यक्रमासाठी दोन दिवसांकरिता फिर्यादीच्या पत्नीचा साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा गंठण मागून घेतला. मात्र, तो परत न करता आरोपीने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी चंदननगर येथील मणप्पुरम गोल्ड लोन शाखेत परस्पर गहाण ठेवला. त्या बदल्यात त्याने १ लाख २९ हजार ५०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
दोन वर्षे पोलिसांना दिला गुंगारा
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी दत्तात्रय तावरे याने वास्तव्याचे पत्ते बदलले होते. त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि बँक खातीही वापरणे बंद केले होते. पोलीस पथकाने त्याच्या सातारा आणि खराडी येथील पत्त्यावर शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. तो वारंवार स्वतःची ओळख आणि ठिकाण बदलून पोलिसांपासून लपून राहत होता.
नवी मुंबईत रचला सापळा
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिल्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी नवी मुंबईतील सानपाडा परिसरात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे धाव घेतली. सानपाडा गावठाण परिसरात स्थानिक गुप्त बातमीदारांच्या मदतीने पाळत ठेवून १४ मे २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीस पथक
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) सोमनाथ मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार किरण घुटे आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने केली.
Accused who had been harassing people for two years arrested from Navi Mumbai
