घोरपडीतील फ्लॅटमधून ६४ हजारांचा ऐवज लंपास
बी.
1 मिनट पठन

बी. टी. कवडे रोड परिसरात उघड्या दरवाजाचा फायदा
पुणे: घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपलेल्या नागरिकाच्या घरात अज्ञात चोरट्याने शिरकाव करून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मनगटी घड्याळ असा तब्बल ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ३४) हे घोरपडी येथील बी. टी. कवडे रोडवरील नंदादीप हाऊस, फ्लॅट क्रमांक ३०१ येथे राहतात. २२ मे २०२६ रोजी सकाळी ७ ते १०.३० या कालावधीत ते घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कुलरजवळ आणि बेडवर ठेवलेले ५ हजार रुपये रोख, मोबाईल फोन तसेच मनगटी घड्याळ असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीचा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
घटनेनंतर मुंढवा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार धोत्रे करत आहेत.
