९ गावठी कट्टे आणि ४६ काडतुसांसह चौघांना अटक
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त
2 मिनट पठन

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त
पिंपरी: देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरुद्ध अत्यंत तीव्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मोठी कारवाई करत चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ९ देशी कट्टे, ५ जादा मॅक्झिन आणि ४६ जिवंत काडतुसे असा ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०, धंदा डिलिव्हरी बॉय, रा. थेरगाव), वैभव अशोक शेटे (वय ३१, धंदा सोशल मीडिया मॅनेजमेंट, रा. थेरगाव), सौरभ धनंजय जाधव (वय २७, धंदा इस्टेट एजंट, रा. पाषाण) आणि अक्षय अशोक कांबळे (वय ३१, धंदा मजुरी, रा. पाषाण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
देहूरोडमधील हत्येनंतर आयुक्त आक्रमक
काही दिवसांपूर्वी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालय परिसरात अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती.
थेट शस्त्रांचा साठा जप्त
गुन्हे शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून अवैध शस्त्रांच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा (रजि. नं. २३४/२०२६) तपास करत असताना या चारही आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी आणि झडती घेतली असता, त्यांच्याकडे शस्त्रांचा मोठा साठा मिळून आला.
८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून ९ देशी बनावटीचे कट्टे (पिस्तूल), ५ अतिरिक्त मॅक्झिन, ४६ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कशासाठी आणि कोणाकडून घेऊन आले होते, याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सपोनि दत्तात्रय गुळीग, श्रेणी फौजदार शिवानंद स्वामी आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
एन्काऊंटर ला घाबरून आरोपी कोर्टात
भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याच्या खुनातील मुख्य आरोपी आफताब समीर शेख हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून होणाऱ्या संभाव्य एन्काऊंटरला घाबरून कोर्टात झाला असून, त्याने तसे लेखी पत्र वडगाव मावळ कोर्टात सादर केले आहे.
