मुख्य सामग्री पर जाएँ

Fin Allen : फिन एलनच्या वादळाने आफ्रिका उडाली! न्यूझीलंड दिमाखात फायनलमध्ये; दक्षिण आफ्रिकेचा 'चोकर्स' टॅग कायम

SA VS NZ T20 : 33 चेंडूत फिन एलनचे विश्वविक्रमी शतक | आफ्रिकेचे 170 धावांचे आव्हान किवींनी 12.5 षटकांतच फत्ते केले | 8 मार्चला रंगणार अंतिम सामना

व
विवेक

2 मिनट पठन

Fin Allen : फिन एलनच्या वादळाने आफ्रिका उडाली! न्यूझीलंड दिमाखात फायनलमध्ये; दक्षिण आफ्रिकेचा 'चोकर्स' टॅग कायम

SA VS NZ T20 : 33 चेंडूत फिन एलनचे विश्वविक्रमी शतक | आफ्रिकेचे 170 धावांचे आव्हान किवींनी 12.5 षटकांतच फत्ते केले | 8 मार्चला रंगणार अंतिम सामना

SA vs NZ semi final T20 World Cup2026 :- दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील विजयरथ रोखत न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने सर्वच आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेला नामोहरम केले. सलामीवीर फिन एलनच्या ऐतिहासिक आणि वादळी शतकाच्या जोरावर किवींनी आफ्रिकेने दिलेले 170 धावांचे लक्ष्य केवळ 12.5 षटकांतच गाठले. या पराभवामुळे स्पर्धेत फेव्हरेट मानला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी डगमगला आणि स्पर्धेतून बाहेर झाला.

फिन एलनचे 'रुद्र' रूप: 33 चेंडूत 100 धावा!

170 धावांचा पाठलाग करताना फिन एलनने आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याने केवळ 33 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद शतकी खेळी केली. त्याला टीम सेफर्टने (58 धावा) उत्तम साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्येच 86 धावा कुटून सामन्यावर पकड मिळवली होती.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी गडगडली

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन दुसऱ्याच षटकात स्वस्तात बाद झाले. डेवाल्ड ब्रेविस (34) आणि एडन मारक्रम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण किवी गोलंदाजांनी त्यांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरीस मार्को यान्सनच्या 30 चेंडूतील 55 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे आफ्रिकेला 20 षटकांत 169 धावांपर्यंत मजल मारता आली.

किवी गोलंदाजांची अचूक टप्प्यावर मारा

न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, कोले मॅककॉन्ची आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी २-२ बळी मिळवून आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. लॉकी फर्ग्युसनने ट्रिस्टन स्टब्सला क्लीन बोल्ड करत आफ्रिकेच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणल्या.

आता लक्ष भारताकडे!

या विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होणार आहे. जर भारताने इंग्लंडला नमवले, तर क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी हाय-व्होल्टेज फायनल पाहायला मिळेल.

शेयर करें