खामगळवाडीत शेतकऱ्यावर कोयत्याने वार
शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
2 मिनट पठन

शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: बारामती तालुक्यातील खामगळवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून एका ४३ वर्षीय शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जमिनीची मशागत करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अडवून, आरोपींनी ‘तुला जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देत डोक्यात गंभीर वार केले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती आप्पा खामगळ (वय ४३, रा. खामगळवाडी, ता. बारामती) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. खामगळवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक १०३ च्या मालकीवरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. १२ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास निवृत्ती हे संपत ठोंबरे आणि मनोज पडळकर यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्या शेतात नांगरटीचे व लेव्हलिंगचे काम करत होते. यावेळी तात्याबा खामगळ आणि रवींद्र तात्याबा खामगळ हे दोघे हातात ऊस तोडण्याचे कोयते घेऊन तिथे आले. आरोपींनी सुरुवातीला ट्रॅक्टरच्या बोनेटवर कोयता मारून नुकसान केले आणि आरडाओरडा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दोघांनी केला कोयत्याने हल्ला
फिर्यादी निवृत्ती यांनी संबंधित जमिनीचा निकाल (रे. मु. नं. ४६४/२०२२) आपल्या बाजूने लागला असल्याचे सांगून, त्याप्रमाणे आपण मशागत करत असल्याचे आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या तात्याबा खामगळ याने ‘तुला आता लय झाले, तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत निवृत्ती यांच्या डोक्यात उजव्या कानावर कोयत्याने जोरदार वार केला. त्यानंतर रवींद्र यानेही निवृत्ती यांच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने मारून गंभीर दुखापत केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निवृत्ती तिथून जिवाच्या आकांताने पळाल्याने त्यांचा जीव वाचला. यावेळी आरोपींनी ट्रॅक्टरचालक संपत ठोंबरे याच्यावरही दगडफेक केली, ज्यामध्ये त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
डगाव निंबाळकर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
या भीषण हल्ल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्याबा खामगळ आणि रवींद्र खामगळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८(१), ११८(२), १२५(अ), ३५२, ३५१(२), ३५ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शेतजमिनीच्या वादातून भरदिवसा झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Farmer attacked with sickle in Khamgalwadi
